पान:देशी हुन्नर.pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ८३ ]

घेतात. इ. स. १८८१ सालीं लखनौ शहरीं तेरा व्यापारी होते, व त्यांनीं एका वर्षांत सुमारें चार हजार रुरुयांचा माल तयार केला. इ. स. १८८२ सालीं कारागिरांची संख्या ३१ झाली, परंतु मालाची किंमत काय ती चार हजार पांचशेच झाली. बिदरी कामाची नक्षी बहुतकरून फुलाच्या आकाराची असते. पुर्णिया गांवीं होत असलेल्या कामास काहीं अंशीं चिनी कामाची झांक मारिते, त्यावरून सर जार्ज बर्डवुड साहेबांचे असें ह्मणणें आहे कीं, सिकीम व भूतान या देशांतून चिनई देशाकडचें कौशल्य पुर्णिया येथे आलें असावे. लखनौ येथें बिदरी कामांत खोदीव नक्षी करितात तिच्या ऐवजीं चांदीच्या पत्री कामाची नक्षी तयार होऊं लागली आहे. या कामास मेहनत कमी लागत असल्यामुळें तें थोडक्यांत विकतां येतें. पत्री मासे तयार करून ते भांड्यांवर बसविण्याची पद्धत लखनौच्या नबाबानीं काढिली. त्याचें कारण असें ह्मणतात कीं, दिल्ली दरबारी हा नवाब पहिल्या प्रतीच्या उमरावांत मोडत असे, व पुण्यांतील हरीपंत तात्याच्या 'जरी पटक्या' प्रमाणें या नबाबास "माहिमुरातीब" मिळालें होते. "माहिमुरातीब" ह्मणजे एका लांब बांबूच्या दांड्यावर बसविलेला एका धातूचा मासा, व त्याच्या दोन बाजूस मुलामा चढविलेल्या दोन घंटा. ही 'माहिमुरातीब ' केवळ पहिल्याच प्रतीच्या सरदारास मात्र मिळत असे, व दिल्लीच्या बादशहाच्या हातून असला मान मिळण्याचें शेवटलें उदाहरण शहाअलम बादशाहाच्या वेळीं घडून आलें. व तेंही लार्ड लेक साहेबांकरितां. हा मानदर्शक मासा सरकार दरबारीं मात्र दाखवून तृप्त न राहतां लखनौच्या नबाबानीं आपल्या घरच्या भांड्यावरसुद्धां प्रचारांत आणिला होता. पूर्णिया गांवीं दोन प्रकारचें काम होतें. एकास 'घरकी' ह्मणतात. त्यांत भांड्यावर खोल घरें खोदून त्यांत नक्षी बसविली असते. दुसरे "करणाबिदरी " या नांवानें प्रसिद्ध आहे. त्यांत नक्षी साधी असून हलकी असते. बिदरी कामांत पत्री कामाचा जो प्रकार वरती सांगितला आहे त्यास "झरबुलंद" ह्मणतात. हें काम मागें वर्णन केलेल्या तंजोर येथील पत्री कामासारखें असते. तें करितांना कोंदणे खोदण्याच्या ऐवजीं भांडीं ओततांना त्याजवर ओतीव नक्षी ओतून तिजवर पत्रें बसवून ती हातोड्यानें ठोकून नीटनेटकीं करितात. या कामांत कधीं कधीं चांदीच्या पत्र्याच्या ऐवजीं रुप्याचा मुलामा दिलेले तांब्यापितळेचे पत्रेही वापरतात.