पान:देशी हुन्नर.pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ८५ ]

पाणी पिण्याचीं व देवपूजेचीं भांडी पुण्यांतील भांडयांपेक्षां सुरेख व विशेष झिलईदार असल्यामुळें अजूनपर्यंत तीच लोकांस विशेष प्रिय आहेत. परंतु अलीकडे रावबहादूर धाकजी काशीनाथ व इतर मंडळोनें विलायती यंत्रें आणून चांगलें झिलईदार काम करण्याचें मनावर घेतलें आहे. त्यामुळें यापुढें नाशकाचें नांव किंचित मागें पडेल असा संभव आहे. त्यांत ही एक अडचण आहेच. नाशिक ही तीर्थाची जागा आहे. व तीर्थास जाणारे हजारो यात्रेकरू तेथें गेल्यावर कांहीं तरी भांडी विकत घेतातच. असली गिऱ्हाइकी पुण्याला मिळणें फार कठीण दिसतें.

 पुणें शहरांत तीन पासून चार हजार पर्यंत तांबट आहेत. व येथें दरसाल पंचवीस लक्षाचा माल तयार होतो. खेडा जिल्ह्यांत अमोद गावीं पंचवीस तीस कासार लोक आहेत.त्यांच्याही कामाची गुजराथेत कीर्ति आहे.शिकारपुरास व लारखाना गांवीं ही पुष्कळ भांडीं होतात. या दोन ठिकाणीं वर्षास सुमारे १२०९३५० रुपयांचा माल तयार होतो. नाशीक व पुणें येथील मुख्य व्यापारी जातीचे दक्षणी कासार आहेत. तरी पुण्यांत कांहीं गुजराथी लोकांचीही मोठमोठी दुकानें आहेत. भांड्याचा व्यापार करणाऱ्या लोकांशिवाय कामगार लोक तीन प्रकारचे आहेत. एक तांबट लोक. हे मोठालीं भांडीं घडतात. दुसरे कल्हईकार अथवा ओतारी. हे लहान लहान भांडीं ओततात. आणि तिसरे चरकवाले. हे भांड्यांस झील देतात. हे कल्हईकर बेदर शहरापासून आले असावेत. नाशीक येथें ग्यानु पांडोबा या नांवाचा एक कल्हईकर आहे त्यांचे काम फार नीट नेटकें व सुरेख असतें.

 गायकवाडी राज्यांत विसानगर या गांवी भांडी तयार होतात. त्यांस काठेवाड व अमदाबाद येथे पुष्कळ गिऱ्हाइकी मिळते. दाभोई व कडी या दोन ठिकाणींही भांडीं तयार होतात.
 ह्या तांबे पितळेच्या कामांत अलीकडे पुष्कळ फेरफार होऊन त्याजवर नक्षीचे काम होऊं लागले आहे. ही नक्षीचीं भांडीं साहेब लोकांस फार प्रिय आहेत. त्यामुळें त्यांस किंमतही पुष्कळ येते. चांदीच्या भांडयावर कच्छी नक्षी होत असते त्याप्रकारची नक्षी तांब्या पितळेच्या भांड्यांवर करून तीं साहेब लोकांस विकण्याची सुरुवात करण्यांचे यश पुणें शहराकडे आहे. हें काम पहिल्यानें पुण्यासच सुरू झालें. हल्लीं मुंबईस व बडोद्यास कांहीं सोनार लोक असलें काम करूं लागले आहेत. तरी पुण्याचेच पाऊल अझून पुढें आहे. मुंबई