पान:देशी हुन्नर.pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २३ ]

हा सर्व प्रदेश कोंरीव दगडांनीं बांधलेल्या अशा सुंदर व सुशोभित इमारतींनीं व्याप्त झाला आहे. चितूर शहरांतील मोडकळीस आलेलीं घरें, अजमीर शहरांतील रूपांतर पावून पैगंबराच्या स्तवनाकरितां मशीदवत् झालेलीं सुशोभित देवालयें, व दिल्ली शहरांतील कुतुब मिनार नांवाचा सर्वप्रसिद्ध मनोरा, या इमारती राजपुताना प्रांतांतील पाथरवटांच्या कौशल्याची प्रत्यक्ष साक्ष देत आहेत. मेहेरबान होपसाहेबांनी एका ठिकाणीं असें लिहून ठेविलें आहे कीं, "मुसलमानलोक हिंदुस्थानांत पहिल्या प्रथम आले त्या वेळीं त्यांच्या आढळण्यांत असें आलें असावें कीं, कौशल्याच्या संबंधानें एतद्वेशीय लोक आपली अक्कल लढविण्याच्या कामांत त्यांच्या बरोबरीनें हुषार असून हस्तकौशल्यांत त्यांच्यापेक्षांही हुषार होते इतकेंच नाहीं; सुधारणेंत त्यांचें पाऊल तर शेंकडों वर्षे बरेच पुढे असल्यामुळें त्यांच्या अंगीं उत्तम प्रकारचें मार्मिकत्वही आलेलें आहे." या यवनांच्या कारकीर्दीतील मनोऱ्यांसारख्या ठळक ठळळ कामाची व टोंकदार मेहरापींची नक्षी या देशांत प्रथम सुरू झाली, व एतद्देशीय लोकांचे अनुकरण करून दिवाणखान्यांत दुतर्फा खांब लावण्याची, बारीक जाळीदार काम करण्याची व सुंदर नक्षी करण्याची त्यांनीं सुरवात केली. प्राचीनकाळच्या मुसलमान तक्ताधिपतींनीं आपापल्या राजधानीच्या शहरांतील सुंदर इमारतींवर नक्षी खोदविण्यास राजपुतानाप्रांतांतील हिंदू कारागीर कामास ठेविले होते. हे हिंदूलोक मुसलमानांच्या हाताखाली काम करूं लागल्यामुळें त्यांच्या नक्षींत मुसलमानी वेलबुट्टीची प्रवृत्ति झाली, व आपल्या प्रांतीं परत गेल्यावर तेथील कामांत या हिंदू कारागीर लोकांनीं मुसलमानी नक्षीचा फैलाव केला. आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल, मशिदी, छत्र्या, व राजमहाल या इमारतीकडे पाहिले ह्मणजे उत्तरहिंदुस्थानांत दगडावरील कोरींव काम परिपूर्ण दशेस येऊन पोहोंचलें होतें असे ह्मटल्यावांचून राहवतच नाहीं. ताजमहालास लागलेला पांढराशुभ्र संगमरवरी दगड जोधपूरच्या राज्यांत सांबर नांवाच्या क्षारसरोवराजवळ असलेल्या खाणींतून काढलेला होता. फत्तेपुरशिकी येथील अकबरबादशहाच्या राजमहालास लागलेला तांबडा दगड भरतपूर येथील खाणींतून काढलेला होता. तसेंच ह्या इमारतींस लागलेला रंगीबेरंगी संगमरवरी दगड जयपूर व अजमीर येथें सांपडला. चुनखडीच्या जातीचे इतर रंगीत दगड दसलमीर येथें सांपडले. मुंबई-इलाख्यांत कल्याण गांवाजवळ असलेलें अंबरनाथाचे देऊळ फार जुनें आहे.