पान:देशी हुन्नर.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २२ ]

लोनियल व इंडिअन" नांवाच्या लंडन शहरांतील मोठ्या प्रदर्शनांत जयपूरच्या महाराजांनी कोरींव लांकडी सामान पुष्कळ पाठविलें होते. या संस्थानांतील जैन लोक आपल्या देवळांवर लांकडाचे कोरींव काम पुष्कळ करवितात.

 बिकानेरसंस्थानांत लांकडाचे कोरींव दरवाजे व कोरींव चौकटी ८ पासून ११० रुपये किमतीपर्यंत विकत मिळतात.

 इंदूरशहरीं लांकडावरील नक्षी करणाऱ्या सुतारास सुमारें दीड रुपया रोज मिळतो.

 म्हैसूरप्रांती असलें काम करणारास बारा आणे रोजमुरा मिळतो.

 काश्मीर देशांत देवदाराच्या लांकडाचे जाळीचें काम विकत मिळतें; त्याची किंमत दर चौरस वारास एक रुपयाप्रमाणें आहे.

 नेपाळदेशांत घरांवर नक्षी कोरून खांब, दरवाजे, मेहेरपी, खिडक्या वगैरे सुशोभित करण्याची चाल सर्वत्र आहे. देवांचीं, राक्षसांचीं, चित्रविचित्र कल्पित जनावरांचीं, सर्पाची व इतर प्राण्यांची चित्रें कोरण्याची तिकडे वहिवाट आहे. असल्या कामास खर्च फार लागतो, त्यामुळें अलीकडे त्यास उतरती कळा लागली आहे.

 ब्रह्मदेश तर लांकडावरील कोरींव कामाचें माहेरघरच आहे असें ह्मटलें तरी चालेल. त्या देशांतील बौद्ध धर्माच्या मंदिरांत कोरीव कामाची भरपूर नक्षी असते. मेहेरबान टिलीसाहेब ह्मणतात कीं, ब्रह्मदेशांतील लांकडावरील कोरींव कामाचे नकाशे काढण्याचें देखील फार कठीण आहे. मग त्याचें पुस्तकांतून नुस्तें वर्णन करणें किती दुर्घट आहे हें सांगावयासच नको. साहेब लोकांकरितां नक्षीचे ‘फरनिचर' करून विकावें या हेतूनें रंगूनशहरीं 'इन्स्टिटयूट आफ् इंडस्ट्रियल आर्ट' या नांवाची एक मंडळी स्थापित झाली आहे. ब्रह्मदेशांत लांकडावरील कोरींव कामाच्या एका चौरस फुटीस बारा आण्यांपासून वीस रुपयांपर्यंत किंमत पडते, तथापि पांच रुपयांस साधारण चांगल्यापैकी काम मिळते. तेथें सुतारास रोजमुरा दीडपासून दोन रुपयेपर्यंत पडतो.

शिल्पकामांत लागणारें दगडावरील कोरींव काम.

 उत्तरहिंदुस्थान व राजपुताना या दोन प्रांतांत दगडाचें कोरींव काम पुष्कळ आढळतें. त्यांतही राजपुतान्यांत इमारती लांकूड दुर्मिळ असून दगड पुष्कळ असल्यामुळें जिकडे तिकडे असल्याच कामाचा फैलावा जास्ती आहे.