पान:देशी हुन्नर.pdf/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १८३ ]

धाबळीचे तीन चार तुकडे टाकून ते तयार केलेल्या रंगात चपचपीत भिजवितात. आपल्या पुढें एक पाट किंवा घडवंची ठेवून तिजवर सुती कापडाचे तीन चार तुकडे एकावर एक पसरितात आणि त्यांच्यावर आणखी एक धाबळी पसरितात, आणि मग रंगारी लोक आसनमांडी घालून घडवंची पुढ्यांत घेऊन सकाळपासून संध्याकाळपयेत एक सारखे कापड छापीत असतात.

 तांबडा रंग छापणें असेल तर मंजिष्टाच्या रंगाचे वर्णन करतांना मागें वर्णन केलेलें फटकें व लोध्रें यांचें पाणी घेऊन, त्यांत बाभळीचा गोंद घालून, घट्ट काला तयार करितात. यास गुजराथेंत 'रस' असें नांव आहे. हा 'रस' लाकडाच्या उथळ कुंडींत टाकून त्याजवर धाबळीचे तुकडे ठेवून ते भिजले ह्मणजे त्याजवर नक्षीचा ठोकळा एकदोन वेळ चेपलासें करून, त्यानें पूर्वी हारडा चढविलेलें कापड घडवंचीवर ठेवून छापतात. अशा रीतीनें छापलेलें कापड सुकलें ह्मणजे तें धुवून, मागें वर्णन केलेल्या मंजिष्टाच्या रंगांत घालून उकळवितात. ज्या ज्या ठिकाणीं तुरटी व लोध्र यांचे पाणी लागलेलें असतें त्या त्या ठिकाणीं मात्र पांढरा रंग चढतो, व कापडाचा इतर भाग पांढरा रहातो, या प्रमाणें तीन चार रंगांची नक्षी छापून कापड सुशोभीत करितां येतें, परंतु ही नक्षी अगदीं ओबड धोबड असल्यामुळें तिचें विलायती छिटांपुढें तेज पडेनासें झालें आहे व उंच प्रतीच्या लोकांत गांवठी पासोडे, जाजम, रजया, वगैरे पदार्थ अगदीं नापसंत होत चालले आहेत. गुजराथेंतील कुणबी वगैरे गरीब लोकांच्या बायका असलीं स्वदेशी रंगी बेरंगी पातळें वापरतात. यांतील तांबडा व काळा हे रंग मात्र अगदीं पक्के असतात. हिरवा, पिंवळा, केशरी, इत्यादि रंग टिकत नाहींत.

 पश्चिम हिंदुस्थानांत असलें काम सिंध प्रांतीं फार चांगलें होतें. पलंगपोस, साड्या, रजयांचे पासोडे, इत्यादि पदार्थ गुजराथेंतही तयार होतात. मुंबईतील पाताणे प्रभु, पांचकळशी, सुतार, पारशी, व वाणी याच्यांत अझून सुद्धां ठशानें छापलेली पागोटीं कोठें कोठें वापरितात. परंतु तें पागोटें मुंबई इलाख्यांत होत नाहीं, ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे. ती मच्छलीपट्टणाहून येतात व त्यांस मुंबईत 'बंदरी पागोटीं ' असें नांव आहे.

 मुंबई शहरांत चिटें छापण्याची ठिकाणें आहेत त्यांत मिळविलेली माहिती खालीं दिली आहे.