पान:देशी हुन्नर.pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १८४ ]

 पिंवळ्या जमिनीवर तांबडी चौकट--कोरें कापड एक रात्र पाण्यांत भिजत ठेवून दुसऱ्या दिवशीं सकाळीं धुवून टाकावें. नंतर हरडया पूड घेऊन ती थंड पाण्यांत कालवून, त्यांत कापड बुडवून, पिळून, सुकवावें. या प्रमाणें हरडी चढविलेल्या कापडावर फटकीच्या पाण्यात भिजविलेल्या गोंदाच्या घट्ट पाण्यानें छाप उठवावे. व कापड सुखवून थंड पाण्यानें धुवून पुनः सुखवावें.

 अडतीस वार लांबीचा एक तागा छापण्यास पांच शेर मंजिष्टाची पूड व तीन शेर धायटीच्या फुलाची पूड, एक हंडाभर पाण्यांत टाकून पाणी पुष्कळ उकळवावें. त्यास कढ येत असतांना त्यांत छापलेलें कापड टाकून उकळवावें ह्मणजे छापलेल्या ठिकाणीं फिक्का ताबूस रंग वठतो. (हा रंग पुढें जास्ती तांबड़ा होणार आहे) कापड भट्टींतून काढून धुवून सुखवावें. यापुढें त्याजवर पिंवळी भुई करावयाची असते त्या करितां दोन शेर "कोचा* हळदीची " पूड, पाणी एकशें वीसशेर, व चुना बारा तोळें हीं एकत्र करून त्यांत तें कापड बुडवून पुष्कळ कालवावें. नंतर पिळून पुन्हां बुडवावें, व तें आंतल्या आंत पायानें मळून पुष्कळ तुडवावें. नंतर पिळून त्यास लागलेली हळद बिळद झटकून टाकावी. आणि दाहा तोंडळे फटकी व ऐंशी शेर पाणी घेऊन त्यांत तें कापड बुडवावें. ह्मणजे पूर्वी छापलेल्या फिकट दिसत असलेल्या तांबूस नक्षी लाल भडक होतें. अखेरीस कापड धुवून त्यास खळ देऊन त्याजवर कुंदी करावी. अशा रीतीनें पिंवळ्या जमिनीवर तांबडया रंगाचे छाप उठविलेल्या कापडास गुजराथेंत "पीलातास" ह्मणतात.

 हिरव्या जमिनीवर पिंवळी आणि तांबडी नक्षी--हरडा चढविलेलें कापड फटकीच्या पाण्यांत घातलेल्या गोंदानें छापून धुवावें; व सुरंगीच्या रंगांत नेहमीं प्रमाणें उकळून काढावें आणि पिळून टाकून धुतल्या शिवाय तसेंच वाळवावें. नंतर उठलेल्या तांबड्या नक्षीवर व इतर कांहीं जाग्यावर चुना गोद आणि पाणी ह्याच्या *मिश्रणानें पुनः छापावें. लवकर सुखण्याकरितां त्याजवर लाकडाचा भुसा टाकावा. म्हणजे तांबड्या रंगाचे रक्षण होतें. व पिंवळ्या रंगास जागा राहते. कापड सुखलें ह्मणजे गुळीच्या पिंपांत बुडवू-


 * 'कोचा' हळद या नांवानें गुजराथी लोकांत प्रसिद्ध असलेला हळदीचाच एक प्रकार आहे. तिचा रंग साध्या हळदीच्या रंगापेक्षां जास्ति टिकाऊ आहे, व तो साध्या हळदीच्या रंगाप्रमाणें लवकर बिघडतहीं नाहीं. ह्मणून कोचा हळद थोडी माहाग आहे तरी गुजराथी लोक रंगांत तीच वापरतात.