पान:देशी हुन्नर.pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १८० ]

तयार करितात. त्यांजवळ पिंपें दोन प्रकारचीं असतात. एक 'खारापिंप' आणि एक 'मिठापिंप'. खाऱ्या पिंपामध्ये सुती कापड रंगवितात, व मिठा (गोड्या) पिंपामध्यें रेशमी कपडे रंगवितात.

 'खारापिंप'--पन्नास हंडे पाणी माईल इतकें एक पिंप घेऊन त्यांत पंधरा हंडे पाणी, चारशेर साजीखार, व दोनशेर चुना टाकितात. नंतर हे दोन्ही पदार्थ ढवळून ढवळून खूप कालवितात. संध्याकाळीं अडीच शेर गुळी घेऊन पाण्यांत भिजत ठेवतात. दुसऱ्या दिवशीं सकाळीं ही भिजलेली गुळी घेऊन, चारफूट चौरस व चार इंच खोल अशी एक दगडाची टांकी असते तींत घालून, हातानें खूप मळतात. पाण्यांत मळून तयार केलेली गुळी वर सांगितलेल्या पिंपांत मग नेऊन ओततात. आणि आंत पुन्हां ढवळतात. पिंपांतील पाणी या पुढें दिवसांतून दोन तीन वेळ ढवळावें लागतें, आणि दर खेपेस तें सुमारे एक एक तास ढवळीत बसावें लागतें. दुसऱ्या दिवशीं संध्याकाळीं पाण्यांत भिजवून दगडी टांकींत कालवून तयार केलेली आणखी अडीच शेर गुळी त्यामध्यें ओतितात. आणि पिंपांतील पाणी पुनः सपाटून ढवळतात. तिसऱ्या दिवशीं त्या पिंपांत एखाद्या जुन्या पिंपांतील एक हंडाभर गाळ ओतितात. या गाळास' भत्ता' असें नांव आहे, पूर्वीचा गाळ शिल्लक नसेल तर खालीं लिहिल्या प्रमाणें कृति करावी लागते. एक शेर चुना, एक शेर खजूर, आणि पांच शेर पाणी, हीं एकत्र करून पाण्याचा रंग पिंवळा होईपर्यंत उकळवावीं. इकडे पूर्वी पिंपांत घातलेला रंग पुष्कळसा ढवळावा, आणि त्यांत खजूराचें पाणी उकळत आहे तोंच ओतावें, व पिंप बंद करून टाकावें. शेवटीं पिंपावर झांकण टाकून तें बंद करून ठेवावें. दुसऱ्या दिवशी सकाळी पिंप* उघडून पाहावें तों आंतील पाणी अंब्याच्या रसाप्रमाणें पिंवळें दिसूं लागतें. अशा रीतीनें पिंपांतलें पाणी आंबलें ह्मणजे तें ढवळलें असतां त्याला दरदरून फेंस येतो. नवीनच पिंप तयार करावयास लागल्यापासून असा रंग सिद्ध होण्यास चार दिवस लागतात. पिंपांवर आलेला फेंस एकत्र करून त्याच्या गोळ्या करून सुकवून ठेवितात. कापड रंगवितांना त्याजवर कोठें एखाद्या ठिकाणी रंग न वठला, तर तेथें चोळण्यास हा फेंस उपयोगी पडतो.


* उत्तर हिंदुस्थनांत उष्णतेचें मान कमी आहे, त्यामुळें मुख्यत्वें थंडीच्या दिवसांत पिंपांतील रंग लवकर आंबावा ह्मणून त्याच्याजवळ त्यास शेक लागेल अशा बेतानें अग्नि पेटवावा लागतो, व रंग तयार झाल्यावरही त्यास ऊन करावा लागतो.