पान:देशी हुन्नर.pdf/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १८१ ]

रंगाची भट्टी बरोबर उतरली कीं नाहीं, हें पिंपावर आलेल्या फेंसावरून रंगारी लोकांस सांगतां येतें. फेंसाचा रंग तांबूस असला ह्मणजे तो चांगला उतरला असें समजावें. फेंस पांढरा दिसूं लागला ह्मणजे त्यांत आणखी दीड शेर साजीखार टाकावा लागतो. रंग हातानें कालवितांना हाताला झोबूं लागला, किंवा तो रक्ताप्रमाणें थिजूं लागला, अथवा तेला सारखा बुळबुळीत लागूं लागला, तर त्यांत सुमारें दोन शेर वजन चांगला खजूर टाकावा लागतो, याप्रमाणें पांचव्या दिवशीं गुळीचा रंग तयार होतो. पिंपांतील रंग संपू लागला ह्मणजे त्यांत पुनः चुना, साजीखार, व गुळी, घालतात; परंतु हे पदार्थ प्रथमारंभी ज्या मानानें घातले असतील त्याच्या निमेनेच घालावे लागतात.

 निळाभोर रंग करणें असेल तर सुती कापड एकरात्र पाण्यांत भिजत ठेवावें, व दुसऱ्या दिवशीं पिंपांत बुडवून अर्धा तासपर्यंत खालवर खूप कालवावें, आणि पिळून सुकत टाकावें, याप्रमाणें तीन दिवस हीच कृति करावी ह्मणजे चांगला रंग सिद्ध होतो.

 रंग फिकाच ठेवणें असेल तर कापड एकदां भिजवून सुकवावें ह्मणजे झाले.
 गुळींत रंगविलेले कपडे बहुतकरून मुसलमान लोक वापरतात, व ते अरबस्तान, इराण, व अफ्रिका या तीन ठिकाणीं पुष्कळ निर्गत होतात.

रेशमी कापड रंगवण्याकरितां "मिठापीप" करण्याची रीति.

 पिपांत बारा हांडे स्वच्छ पाणी ओतावें, त्यांत दोनशेर साजिखार टाकावा, व तें तीन दिवस तसेंच ठेवावे. चवथ्या दिवशीं त्यांत अडीचशेर बंगाली किंवा मद्रासी नीळ टाकावी. नंतर दोनशेर साजीखार व एकशेर चुना आंत टाकून पिपांतल्या सर्व जिनसा एकत्र कालवाव्या; चवथ्या दिवशीं दीडशेर पाणी घेऊन त्यांत दोनशेर चुना व दोनशेर गूळ कालवून तें पिंपांत ओतून ढवळावें. नंतर तीन दिवस पिंप मधून मधून ढवळीत असावें. ह्मणजे चवथ्या दिवशीं तें पाणी आंबतें त्यांतून 'फट' 'फट' असा आवाज निघूं लागतो, व त्याजवर फेंस येतो. फेंस पांढरा असला तर दीडशेर साजीखार व दीडशेर चुना त्यांत टाकावा आणि तो कालवून एक दिवस पिंप झांकून ठेवावें. फेंस तांबूस दिंसू लागला ह्मणजे त्यांत आणखी कांहीं टाकूं नये.