पान:देशी हुन्नर.pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १२८ ]

 वायव्यप्रांतांत अजमगडास चांगले खुजे तयार करितात. तेथील भांडीं काळ्या रंगाचीं असून त्यांजवर पांढऱ्या वर्खाची नक्षी चिकटविलेली असते. त्यामुळें तीं बिदरी भांड्यांसारखी दिसतात. हीं मडकीं कशी करितात हें कळत नाहीं. तरी सर जार्ज वर्डऊड यांचें असें ह्मणणें आहे कीं भाजतांना मडक्याला मोहरीची पेंड लावून भाजतात त्यामुळें तीं काळीं होतात, त्यांजवर पांडरा वर्ख लावीत नाहींत तर आरशावर पारा चढवितात. त्याप्रमाणें, भांडीं खोंदून त्यांच्या कोंदणांतून पारा चढवितात. लखनौस सुरया, बशा वगैरे जिनसा होतात. रामपूर येथील मडकीं निळ्या, पांढऱ्या, किंवा तांबूस रंगाचीं असतात. बुलंदशहर जिल्ह्यांत सुर्ज्या म्हणून एक गांव आहे तेथें फार चांगलीं मडकीं होतात. अयोध्या प्रांतांत बारबंकी जिल्ह्यांत देवा गांवीं कुंभाराच्या एका कुटुंबांत चिनी भांडीं होतात. अल्लीगडास एका प्रकारचीं मडकीं होतात त्यांचीही प्रसिद्धि आहे. अमरोहा गांवीं फार पातळ मडकीं करितात. त्यांस " कागझी " ह्मणजे कागदी असें ह्मणतात. साहारणपुरास सुरया वगैरे मडकीं करून त्यांजवर वर्ख चढवितात. गोंडा जिल्ह्यांत अत्रावला या गांवीं तसेंच सितापूर या गांवीं मातीचीं सुंदर भांडी करून त्यांजवर हातानें नक्षी काढितात.

 राजपुतान्यांत आलीकडे मातीच्या चिनई मडक्यांबद्दल जयपुराची फार ख्याती झाली आहे. हीं भांडीं कांहीं अंशीं दिल्लीच्या भांड्यासारखीं असून कांहीं अंशीं मिसर देशांतील भांड्यांसारखीं दिसतात. जयपुरास होणारीं बहुतेक भांडी तेथील हुन्नर शाळेतं किंवा शाळेंत शिकून स्वतंत्र दुकान काढणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तयार होऊन येतात. माती गाळून तयार करून ती साच्यांत थापून तिचीं भांडीं करितात. व त्यांजवर फेल्सपार व गव्हाचा आटा याचें पूट देऊन भाजतात. रोगणास रंग देण्याकरितां लागणारे पदार्थ जयपूर संस्थानांतच भगोर आणि खेत्री या गांवीं सांपडतात. मातीचीं साधीं भांडीं जयपूर संस्थानांत बासी गांवीं होतात, त्यांतही तेथील हुक्के विशेष प्रसिद्ध आहेत. बासी येथील आगगाडीच्या स्टेशनावर हीं भांडीं विकावयास ठेविलेलीं आहेत. लालसोट नांवाच्या खेड्यांतही चांगलीं मडकीं होतात असें कित्येकांचें ह्मणणें आहे. सांबर सरोवराच्या कांठावर गुढा ह्मणून एक गांव आहे, तेथेंही एका प्रकारची मातीची भांडीं तयार होतात. तीं बटक या नांवानें प्रसिद्ध आहेत.