पान:देशी हुन्नर.pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १२७ ]

तयार करतात त्यांत फेल्स्पार नांवाच्या दगडाची पूड असते. या रोगणी कामास काशीकाम म्हणतात. व तें करणाऱ्या लोकांस काशीगर असें ह्मणतात. दिल्ली, आग्रा आणि लाहोर, या गांवीं निळा व पिरोज, हे दोन रंग फार चांगले होतात. तेथील काशीगारांस तांबडा व पिंवळा रंग चांगला साधत नाहीं. मुलतानांत गारेची पूड करून, ती पाण्यांत कालवून, तिनें मडकें सारवून, नंतर तिजवर नक्षी काढून मग रोगण चढवितात. पेशावर येथें होणारीं भांडी मूलतान येथें होणाऱ्या भांड्यासारखी चांगलीं नसतात. लाहोरास 'मर्तबान' या नांवाची मिठाई ठेवण्याची भांडीं, हुक्के व प्याले असल्या कांहीं जिनसा तयार होतात. लाहोरच्या आसपास मडकीं व विटा भाजून शिल्लक राहिलेल्या गाळाचीं मोठालीं टेपाडें आहेत, त्यावरून पूर्वी त्या गांवीं चिनी भांडी पुष्कळ होत असावीं असें वाटतें. जलंदरास महंमद शरीफ या नांवाचा एक कशीगर आहे, त्यास मडक्यावर पाहिजे त्या रंगाचें रोगण चढवितां येतें असें ह्मणतात. गुजरणवाला व भावलपूर, या गांवीं कागदीं मडकीं ह्मणजे अतिशय पातळ मडकीं तयार होत असत हुशारपुरास साध्या मडक्यावर भिंतींवरील चित्रांप्रमाणे चित्रें काढितात. छाजर गांवीं मडक्यांवर नुसता काळा रंग देतात.
 सिंध प्रांती हाला व ठट्टा शहरीं चिनी मडकीं होतात. ह्या दोन गांवीं पूर्वी मीर नांवाच्या राज्यकर्त्यांची वस्ती होती. त्यांतील एका राज्यकर्त्यांने एका चिनई मनुष्यास आपल्या राज्यांत ठेवून घेऊन त्यास जाहागिरी करून दिली, त्यामुळें हा हुन्नर सिंध देशांत आला, अशी तेथील काशीगर लोकांची समजूत आहे. त्यांच्यांतील दोन असामी मुंबईस आले होते तेव्हां त्यांनी आह्मांस तर असे सांगितले की आह्मी त्या चिनई कुंभाराचे वंशज आहोत. सिंध येथील बरण्यांस हल्लीं साहेब लोकांत पुष्कळ गिऱ्हाइकें आहेत. मुंबईत मेहेरबान टेरी साहेब यांनीं हाला येथील एका काशिगारास आणून ठेविला आहे, त्याच्या मदतीनें साहेबबहादूर पुष्कळ तऱ्हेचीं भांडीं तयार करवीत असतात. त्यांत अजंठा येथील लेण्यांत असलेल्या भिंतीवरील नक्षी मडक्यांवर काढतात यामुळें त्यांस अधिकच शोभा आणितां येते. गायकवाडींत पट्टण गांवीं होत असलेल्या मडक्यांची ख्याती आहे. या मडक्यांचा आकार चित्रविचित्र असतो. एका हुक्यांस कधीं कधीं पांच पांच तोंडे करितात. रोगणाचें काम पट्टणांत फार क्वचित होतें. नागांव येथें शेट पिरोजशा यांनीही चिनई भांडीं करण्याचा कारखाना काढिला आहे.