पान:ज्योतिर्विलास.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६    ज्योतिर्विलास.

ते. म्हणजे तो एक ग्रह आहे. गुरुशुक्रादिक ग्रह आपल्यास जसे तेजस्वी दिसतात, तशी त्यांवरून आपली पृथ्वी दिसत असली पाहिजे.

 चंद्र आणि ग्रह ह्यांच्या कक्षा क्रांतिवृत्ताच्या आसपास आहेत, व त्यास छेदितात. त्या कक्षा आणि क्रांतिवृत्त ह्यांमध्ये लहान मोठे कोन होतात. त्यांस विक्षेप म्हणतात. ते सर्व सुमारे साडेसात अंशांच्या आंत आहेत. यामुळे क्रांतिवृत्ताच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस एकंदर सुमारे १५ अंश रुंदीच्या प्रदेशांत ग्रह फिरत असतात. ह्या प्रदेशास आपण क्रांतिप्रदेश म्हणूं.

 वाचक म्हणतील की, काय ही कंटाळवाणी बडबड लाविली आहे ? परंतु असे पहा की, मुंबई, पुणे इत्यादि प्रसिद्ध नगरे ज्यांनी पाहिली नाहीत अशा अपरिचित मनुष्यास त्यांतील नामांकित व शोभायमान् इमारती पहावयाच्या असल्या तर मुंबई, पुणे ही कोठे आहेत, त्यांतील कोणत्या रस्त्यावर, कोणत्या पेठेत, किंवा महल्लयांत कोणती इमारत आहे याचा शोध प्रथम केला पाहिजे. पृथ्वीवर ही गोष्ट, तर स्वर्गातील देवांची मंदिरे पाहण्यास कांही तयारी नको काय ?

 देव शब्दाचा एक अर्थ प्रकाशणारा असा आहे. चंद्रसूर्यशुक्रादि दिव्य तेजें नक्षत्रांतून आकाशांत संचार करीत असतात, हे देव होत. त्यांत कोणास सर्व आकाशाचे क्रमण करण्यास काही दिवस लागतात. कोणास काही महिने लागतात. कोणी काही वर्षे फिरतात. आणि काहींना तर मनुष्याच्या आयुष्याहून जास्त वर्षे लागतात. हा प्रवास करीत असतां त्यांस मार्गात वस्ती करण्याकरिता तारारूप रत्नजडित मंदिरें बांधिलेली आहेत. 'नक्षत्रे ही देवांची मंदिरेच आहे,' असे वेदांतही म्हटले आहे. ही मंदिरे पाहण्याची आपली पूर्वतयारी झाली. आतां त्यांत प्रवेश करूं. आमचे वाचक म्हणतील की, 'आम्हांस एव्हांशीच स्वर्गात नेतां की काय ?' -पण मित्रहो, भिऊ नका. आपण येथूनच स्वर्ग पाहूं. आता खरोखरच आपल्या पृथ्वीसारखी व तीहून अति मोठी गुरु, शनि इत्यादि भुवनें, आकाशादिकांनी त्यांचे पोषण करणारा पूषा, आणि त्यांसारखे किंवा त्यांहून हजार पट मोठे आणि लक्षावधि योजने अंतरावर असणारे तारकारूप अगणित लोक, ह्यांचे अवलोकन करून त्या सर्वांच्या नियामकाच्या विचारांत लीन होणे, ह्याहून दुसरा स्वर्ग कोणता आहे ?

 तारा आणि नक्षत्र यांच्या अर्थांत थोडासा भेद आहे. चंद्रादिकांच्या मार्गातल्या ज्या ठळक तारका त्यांस नक्षत्रे म्हणतात. चंद्रास सर्व आकाशांतून फिरण्यास २७। दिवस लागतात. त्यावरून २७ किंवा २८ नक्षत्रे आमच्या पूर्वजांनी मानिली. चंद्राच्या एका दिवसाच्या मार्गात अनेक तारा असतात. त्यांत काही चांगल्या ठळक दिसतात, काही बारीक असतात. कोठे ठळक तारा एकादीच आहे, कोठे मुळीच नाही. यामुळे काही नक्षत्रांची एकेकच तारा आहे, काहीच्या जास्त आहेत. काहींमध्ये ठळक तारा मुळीच नाहीत.

 नक्षत्रपटांवरून नक्षत्रांची ओळख करून घेण्याची सामान्य रीति मागील प्रक-