पान:ज्योतिर्विलास.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
देवांची मंदिरें.    २७

रणांत सांगितलीच आहे. आणखी काही उपयोगी सामान्य नियम येथे सांगतो.

 चंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो, यामुळे अश्विनी, भरणी इत्यादि नक्षत्रे आकाशांत क्रमाने पश्चिमेकडून पूर्वेकडे आहेत. एकादें नक्षत्र आकाशांत एका ठिकाणी दिसले तर त्याच्या पुढचे त्याच्या पूर्वेस असावयाचे.

 एका वेळी अर्धे आकाश आपणांस दिसते. म्हणून सुमारे १३ नक्षत्रे मात्र एका वेळी दिसतात. आवशीस १२।१३ नक्षत्रे पाहिली तर दुसरी १२।१३ पहाटेस दिसतात. सूर्य ज्या नक्षत्री असतो तें व त्याच्या पुढचे मागचे एकादें नक्षत्र सूर्याच्या तेजामुळे मुळीच दिसत नाही. सारांश पहाटेस व आवशीस पाहिले तर २५ नक्षत्रे एका रात्रीत दिसतील.

 ज्या तारांची ओळख झाली त्या, व दुसऱ्या, ह्यांचे नकाशांतील अंतर व दिशा ह्यांची आकाशांतील स्थितीशी तुलना करणे हे नवीन तारा ओळखण्यास फार उपयोगी आहे.

 सत्तावीस नक्षत्रांपैकी, अश्विनी, भरणी, पुनर्वसूच्या चार तारांपैकी उत्तरेच्या दोन, पूर्वा, उत्तरा, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा आणि उत्तराभाद्रपदा ह्या १० नक्षत्रांच्या तारांच्या दक्षिणेकडून चंद्र जातो. मृगशीर्ष, आर्द्रा, आश्रेषा,हस्त, मूळ या पांचांच्या उत्तरेकडून जातो. बाकीच्यांच्या दोहींकडून जातो. कधी वळून जातो, कधी त्यांचे आच्छादन करितो. यासंबंधे अधिक वर्णन पुढे येईल.

 अमुक नक्षत्राच्या योगतारेशी चंद्राची युति* अमुक वेळी होईल, असे सायन पंचांगांत ताराचंद्रयुति-कोष्टकांत रोजचे दिलेले असते. त्याचाही उपयोग नक्षत्रांची ओळख करून घेण्यास होईल. पहिल्या प्रतीच्या तारा, चंद्र जवळ असला, तरी दिसतात. बाकीच्यांच्या अगदी जवळ चंद्र असला, तर त्या मुळीच दिसत नाहीत. जसजसें चंद्राचे तेज जास्त होऊ लागते किंवा त्याचे अंतर कमी होऊ लागते, तसतशा त्या दिसतनाशा होतात. युतीच्या वेळी त्या दिसल्या नाहीत, तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पहाव्या. चांदण्यारात्री चंद्राजवळची एकदोन खेरीज करून बाकीची नक्षत्रे पहाणे सोईचे. कारण त्या वेळी बारीक तारा लोपलेल्या असतात.

 चैत्र, वैशाख इत्यादि नांवें नक्षत्रांवरून पडली आहेत. ती नक्षत्रे त्या त्या महिन्यांत आवशीस उगवतात आणि पहाटेस मावळतात. ती अशी:-

-----

 * दोन खस्थ ज्योतीस सांधणारी रेषा ध्रुवांतून जाते तेव्हां त्या दोहोंची युति झाली असें म्हणतात. म्हणजे या वेळी त्या दोहोंचें पूर्वपश्चिम अंतर शून्य होते; दक्षिणोत्तर अंतर कितीही असूं शकेल. दोन ज्योतींचा भोग सारखा होतो तेव्हां ही युति झाली असे म्हणतात. युतीला योग असेंही म्हणतात. युतिकाली दोन ज्योतीचें दक्षिणोत्तर अंतर एक अंशाहून कमी असले तर त्यांचे युद्ध झाले असे म्हणतात; दोहोंची बिबें परस्परांस लागली तर उल्लेख म्हणतात. संपातापासून किंवा दसऱ्या मानलेल्या आरंभस्थानापासन मोजलेलें, ज्योतीपासून क्रांतिवृत्तावर काढलेला लंब त्यास छोदितो तेथपर्यंत जें अंतर त्यास भोग म्हणतात.