पान:ज्योतिर्विलास.pdf/४१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


देवांची मंदिरें.    २५

दोनदा डोक्यावर येतो. उन्हाळ्यांत आपल्या देशांत अति उष्णता उत्पन्न झाली म्हणजे दक्षिणेकडून मोसमीचा वारा वाहूं लागतो. आणि त्याबरोबर पाऊस पडतो.

 सूर्य विषुववृत्तांतून फिरता तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे निरनिराळे ऋतु झाले नसते. तो, म्हणजे वस्तुतः पृथ्वी, क्रांतिवृत्ताच्या पातळीतून फिरते, आणि क्रांतिवृत्त विषुववृत्ताशी २३॥ अंशांनी तिर्कस आहे, ही परमेश्वराची किती चमत्कारिक योजना आहे! आपल्या पृथ्वीची कक्षा विषुववृत्ताशी तिर्कस आहे, तशीच इतर ग्रहांचीही कमजास्त तिर्कस आहे. यामुळे त्या ग्रहांवरही ऋतु होत असतील. असो, त्यासंबंधे वर्णन पुढे येईल.

 मार्चच्या २१ व्या तारखेस सूर्य ज्या संपाती येऊन उत्तरगोलार्धात जातो, यास वसंतसंपात किंवा उत्तरसंपात म्हणतात. यावेळी वसंत ऋतु असतो; आणि सायन मेषसंक्रमण होते. सप्तंबरांत सूर्य ज्या संपातांत असतो, त्यास शारदसंपात अथवा दक्षिणसंपात म्हणतात. ह्या वेळी शरदृतू असतो. क्रांतिवृत्ताचे बारा भाग करितात, त्यांस राशि म्हणतात. त्यांस मेष, वृषभ इत्यादि नांवे आहेत. वसंतसंपात आणि ध्रुव ह्यांतून जाणारें जें वृत्तार्ध, ते आकाशांतलें मुख्य यामोत्तरवृत्त होय. ह्यापासून आकाशस्थ ज्योतीचे जें अंतर ते विषुवांश, असे पूर्वी सांगितलेच आहे. हे अंतर तारेवरून जाणारा लंब विषुववृत्तास जेथें छेदितो बिंदु आणि वसंतसंपात ह्यांमध्ये विषुववृत्तावर मोजितात. हे त्या संपातापासून स मोजितात.

 सूर्याच्या भासमान दैनंदिन गतीचा आणि वार्षिक गतीचा विचार करीत असता निरनिराळे ऋतु होण्याचे कारण सहज आपल्यास कळले.

 एथवर केलेल्या विचारावरून दिसून येते की, सर्व तारा दिवसांत एकदा सगळया आकाशांतून भ्रमण करितात, आणि आज संध्याकाळी जेथे पहाव्या त्याच्या थोड्या पश्चिमेस दुसऱ्या दिवशी सायंकाळी दिसतात, ह्या दोन्ही गति भासमान आहेत; वास्तविक नव्हेत. चंद्र, शुक्र, इत्यादि कांहीं तेजांची मात्र स्थाने खरोखर पालटतात. बाकी सर्व तारांचे परस्परांमधलें अंतर बदलत नाही. त्या तुह्मी आज पहा, पुढे केव्हाही पहा. दोन हजार वर्षांपूर्वी त्या जशा दिसत होत्या, तशाच बहुधा आज दिसतात. व पुढे दोन हजार वर्षांनी अशाच दिसतील. त्यांस थोडी गति आहे, तिला वास्तव-गति म्हणतात. परंतु ती इतकी अल्प आहे की, दोन हजार वर्षांतही ती फारशी अनुभवास येत नाही. म्हणून त्यांस स्थिरच समजतात. याप्रमाणे स्थिर आणि चर असे आकाशस्थ ज्योतींचे दोन प्रकार होतात. चलांपैकी बुधादि कांहीं तारा सूर्याभोवती फिरतात, आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. जी तेजें सूर्याभोवती फिरतात, त्यांस ग्रह म्हणतात. आणि जी तेजें ग्रहाभोंवतीं फिरतात, त्यांस उपग्रह म्हणतात. आकाशांतील एका तेजाचा दुसऱ्या तेजाभोंवती फिरण्याचा जो मार्ग त्यास कक्षा म्हणतात. आपली पृथ्वी सूर्याभोवती फिर-