पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन माणूस स्वतःच स्वतःची झाडाझडती घेत असतो. त्यासाठी आरशासारखं दुसरं पारदर्शी, वस्तुनिष्ठ साधन दुसरं नाही. आता तुमच्या लक्षात येईल की, कुमारन आशाननी मंदिरात देवाऐवजी आरसा ठेवून किती मोठी क्रांती केली होती ते. ‘आशान' शब्दाचा केरळच्या मल्याळम् भाषेत अर्थ आहे गुरू किंवा शिक्षक. कुमारन आशान हा तसं पाहिलं तर जाती नि धर्मनिरपेक्ष आधुनिक भारताचा खरा समाजशिक्षक होता. केरळ सरकारने त्याच्या जन्मभूमी, कर्मभूमी व मोक्षभूमीत स्वतंत्र अशी जयंती स्मारक, कर्मकेंद्र व प्रेरणास्थल उभारली आहेत. आपणाकडे वि. स. खांडेकरांची अशी जयंती स्मारक (सांगली), कर्मकेंद्र (शिरोडा) व प्रेरणास्थल (कोल्हापूर) उभारायला हवीत.

 देव, माणूस आणि आरशात एक अद्वैत आहे. तिन्हीचं खरं रूप पारदर्शी, वस्तुनिष्ठ, मग माणूस सापेक्ष होतो केव्हा नि कसा? तर रुढी, परंपरा नि संस्कारांनी त्याची जडण-घडण होत असते. या जडणघडणीतून त्याच्या जाणिवा विकसित होत असतात. जाणिवेत अनुभव, पाहाणं, ऐकणं, कल्पना, वाचन, विचार, विवेक साऱ्यांचा समावेश असतो. त्यातून आत्मनिष्ठेच्या जागी समाजनिष्ठा निर्माण होते. ती माणसास खरा देवमाणूस बनवते. माणसास पारदर्शी, वस्तुनिष्ठ बनवण्यासाठी मी आरसे महाल नाही तर आरसा मंदिर, आशान मंदिर बांधायचं ठरवलंय. वर्गणी द्याल ना?

◼◼

जाणिवांची आरास/११४