पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





देव, माणूस आणि आरसा

 सध्या महाराष्ट्र शासनाने यावर्षी उत्कृष्ट वाङ्मयीन कृती म्हणून गौरविलेल्या साहित्याचे वाचन सुरू आहे. या उद्योगात विजया राजाध्यक्ष यांचं ‘बहुपेडी विंदां'चे दोन खंड हाती लागले. वाचकांच्या हातातून वाचता वाचता अनेक पुस्तके सटकतात. फारच कमी हाती लागतात. त्यापैकी ही होत. माझ्या हाती लागलेली.

 या पुस्तकाच्या पहिल्या खंडात विंदा करंदीकरांची प्रदीर्घ मुलाखत आहे. प्रत्येक साहित्यप्रेमी, अभ्यासकांनी साहित्य व्यवहार समजून घेण्यासाठी ती वाचायला हवी.

 त्यात एक छोटा प्रसंग आहे. कवी विंदा करंदीकरांना केरळ कवी कुमारन आशान स्मृती पुरस्कार लाभला होता. आपणाला ज्याच्या नावे पुरस्कार मिळाला तो कवी समजून घेताना त्यांच्या लक्षात आलं की, हा कवी होता तसा समाजसुधारक. आशान जन्माने अस्पृश्य होता. त्याच्या कळत्या वयापर्यंत मंदिरात त्याला कधी प्रवेश मिळाला नाही. म्हणून समज आल्यावर त्यांनी आपले गुरू नारायण गुरुस्वामी यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश असलेल्या मंदिरांची केरळच्या गावोगावी उभारणी केली. अशी पहिली पस्तीस मंदिरं बांधली. त्यात देवांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, पण छत्तीसावं मंदिर बांधलं तेव्हा त्यांनी देवाच्या जागी आरसा बसवला व केरळात एकच गहजब झाला.

 माणूस देवळात का जातो? ते त्याचं मानसिक दौर्बल्य असतं की तो स्वतःला तिथं जाऊन बलशाली, सर्वगुणसंपन्न बनवू इच्छितो? हा वादाचा मुद्दा आहे. पण मंदिरं ही माणसास त्याचं खरं रूप जाणवून देतात. शिवाय

जाणिवांची आरास/११३