पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असंवाद

 काल मी एका रोटरी क्लबच्या साप्ताहिक बैठकीस गेलो होतो. व्याख्याता म्हणून कोणत्या विषयावर बोलणार असे विचारल्यावर मी उत्स्फूर्तपणे एक विषय सांगून टाकला - ‘समाज : एक असंवादाचे घर'. हा विषय जरी मी अनावधानाने सांगितला तरी अनेक दिवस हा विषय माझ्या मनात खदखदत होता हे खरे!
 असं का व्हावं आपलं की आपण एकमेकांशी दिवसेंदिवस कमी बोलू लागलो आहोत. आपण हसेनासे झालो म्हणून. मग समाजात ‘हास्य क्लब' आले. तसे आता एकमेकांशी बोलण्याची 'चॅटिंग सेंटर्स' आली तर मला नवल वाटणार नाही. माणूस रोज महत्त्वाकांक्षेच्या सुवर्णमृगामागे, कांचनमृगामागे धावतो आहे. कस्तुरीमृगासारखी माणसाची स्थिती झाली आहे. स्वतःकडे असलेला गंध तो त्याच्या गावीच राहिला नाही. अंतर्स्वराचीगुंज न ऐकणारा माणूस डॉल्बी ऐकत बहिरा जसा झाला तसा फोन, टी.व्ही., इंटरनेटमुळे मुकाही झाला आहे असे मला वाटते.
  माणसास भौतिकच सर्वस्व वाटू लागलं आहे. भौतिकतेचा ध्यास माणसात हव्यास निर्माण करतो. हव्यास हे एक व्यसन आहे. ते माणसास रेसच्या घोड्यासारखं सतत गतीचा फायदा पाळण्यास भाग पाडतं. आपण पळतो खरे! पण का पळतो याचा विचार करायची उसंत त्याला उरलेली नाही. सारा समाज एका वेगळ्या आत्ममग्न अवस्थेकडे घोडदौड करता झाला आहे. एकत्र आपण राहतो, जेवतो, बोलतो त्या सर्व व्यवहारास असलेली औपचारिकतेची झालर रोज रूंद होते आहे. घरात बोलणारी यंत्रे

जाणिवांची आरास/१०७