पान:गांव-गाडा.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६      गांव-गाडा.


लागते. वारचा वतनदार सोळा आण्यांचा मालक असला तर त्याची तहायात म्हणजे साठ वर्षांच्या उमरीपर्यंत नेमणूक होते. सोळा आण्यापेक्षा कमी आणेवारी असली तर कुळकर्ण्यांची पांच वर्षे व पाटलांची दहावर्षे नेमणूक करतात. कामगार पाटील कुळकर्ण्यांचे गैरवर्तन किंवा कामांत सदोदित निष्काळजीपणा दिसून आला किंवा ते मोठ्या गुन्ह्यांत सांपडले, म्हणजे वारच्या वतनदाराचें वतन खालसा होते; मग अपराध करणारा वारचा वतनदार असो किंवा गुमास्ता असो. वतनाची वारस चौकशी प्रांताचे अधिकारी मामलेदारामार्फत करतात. परंतु वतनाचा मोह असा दांडगा असतो की, त्याबद्दलचे पुष्कळ कज्जे रेव्हेन्यू कमिशनरपर्यंत व कित्येक थेट सरकारापर्यंतही जातात.

 सर्व्हे किंवा रिव्हिजन सेटलमेंटच्या वेळी पाटील-कुळकर्ण्यांच्या मुशाहिऱ्याची आकारणी विंगेट-स्केलप्रमाणे होते. जमीनमहसुलाच्या पहिल्या हजारीं शेकडा ३, दुसऱ्या हजारीं शेंकडा २ व पुढे शेकडा १ ह्याप्रमाणे पाटील मुशाहिरा आकारतात; आणि कुळकर्णी मुशाहिरा पहिल्या हजारीं शेकडा ५, दुसऱ्या हजारीं शेंकडा ४, तिसऱ्या हजारीं शेंकडा ३, चौथे हजारीं शेकडा २ व पुढे शेकडा १ ह्याप्रमाणे आकारतात. गांवाला इरिगेशनचा वसूल असला, तर जमीनबाब व इरिगेशन ह्या दोन्ही बाबी एक करून त्यांच्या बेरजेवर वरील प्रमाणांत पाटीलकुळकर्ण्यांचा मुशाहिरा आकारतात. ह्यांखेरीज लोकल फंडाच्या वसुलावर पाटलाला ५ ते १० रुपयेपर्यंत दोन आणे, ११ ते २५ चार आणे, २६ ते ५० आठ आणे, ५१ ते ७५ दहा आणे, ७६ ते १०० बारा आणे, १०१ ते १२५ एक रुपया व पुढे दर पंचवीस रुपयांना चार आणे प्रमाणे मुशाहिरा मिळतो; आणि कुळकर्ण्यांला पाटलाच्या दुप्पट मिळतोः वनचराईच्या वसुलांत पाटलाला आठ आण्यांच्या धरसोडीने दर रुपयास सहा पै व कुळकर्ण्यांला नऊ पै देतात. कोंडवाड्याच्या वसुलाची चौथाई करून ती पाटील कुळकर्ण्यांत निमानिम वांटून देतात. पाटलाला पोटगी व चावडीखर्च ऊर्फ 'तेल कांबळा' गांवच्या लोकसंख्ये-