पान:गांव-गाडा.pdf/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वेतन.      ७५


योजिलें आहे. गुजरात, कोंकणमध्ये कुळकर्णी वेतनदार झाला आहे. त्याला तलाठी म्हणतात. देश व दक्षिण महाराष्ट्र ह्यांतल्या सुमारे दहा जिल्ह्यांत तो अजून वतनदार आहे, व तलाठी होण्याच्या पंथास लागला आहे. पाटील, महार, जागल्या हे सर्वत्र वतनदार आहेत. वतनदारांसंबंधाने सरकाराने मुंबईचा सन १८७४ चा अॅक्ट ३ (वतन कायदा) केला आहे. सरकारचा खेड्यांतला मुख्य प्रतिनिधि पाटील होय. बहुतेक पाटील लिहिणारे नसल्यामुळे गांवचा सर्व सरकारी पत्रव्यवहार एकट्या पाटलाच्या नांवानें न चालतां पाटील-कुळकर्णी या जोडनांवाने चालतो, आणि गांवच्या सरकारी कागदपत्रांवर दोघांनाही सह्या कराव्या लागतात. पाटील निरक्षर असला तर तो आपल्या सहीची निशाणी करतो. सरकारउपयोगी वतनदार गांवकामगारांची नेमणूक वर सांगितलेल्या वतन अॅक्टाप्रमाणे होते. पाटील-कुळकण्यांच्या वतनांच्या तक्षिमा, वडीलकी व पाळ्या वगैरेंची चौकशी करून सरकारनें वतन रजिष्टर तयार केलें आहे; त्यांत जे 'वारचे' वतनदार लागले आहेत, ते आपापल्या आणेवारीप्रमाणे स्वतः किंवा गुमास्त्यामार्फत काम करतात. गांव कितीही लहान असला तरी त्याला स्वतंत्र पाटील असावयाचाच, आणि बहुतेक खेड्यांत एकाच पाटलाकडे मुलकी व फौजदारी काम असते. गांवें फार लहान असली तर एका कुळकर्ण्याकडे दोन ते आठपर्यंत गांवें असतात, आणि मोठ्या गांवांत एकाहून अधिक मुलकी व पोलीस पाटील आणि कुळकर्णी नेमतात. कोणत्या गांवाला किती पाटील-कुळकर्णी असावयाचे हे सरकार ठरवितें. पाटील-कुळकण्यांची संख्या ठरवितांना सरकार पूर्वापार वहिवाटीपेक्षां प्रस्तुत कामाच्या मानावर जास्त भिस्त टाकतें. पाटील-कुळकण्यांची नेमणूक मुलकी प्रांताचे अधिकारी करतात. कामावर जो पाटील किंवा कुळकर्णी नेमावयाचा तो वयांत आलेला, चांगले वर्तणुकीचा, आणि काम करण्यास लायक असा पाहिजे. तो तसा नसला तर तो वारचा वतनदार असला तरी त्याला कामावर नेमतां येत नाही. पाटील निरक्षर असला तरी चालतो, परंतु कुळकर्ण्याला कुळकर्णाची परीक्षा द्यावी