पान:गांव-गाडा.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गांव-मुकादमानी.      ५१


शीव ह्याबद्दल भानगडं उपस्थित झाली की महाराच्या साक्षीवर सगळी भिस्त असे. रयतेच्या दृष्टीने हा महाराचा फारच मोठा उपयोग होता, कारण वांटपांच्या कामांत भाऊवांटण्या व वहिवाट ह्यांची खात्रीशीर माहिती महार सांगत. सर्व वतनांत महारकी वतन अत्यंत समायिक असल्यामुळे महार आपापसांत वेसकरकी, गांवकी व घरकीच्या कामांवर जरूर तितके इसम नेमून देत. फौजदारी व मुलकी कामें एकट्या महाराकडे राहिली अशी गांवें थोडी आहेत. पुष्कळ ठिकाणी त्यांची फारकत होऊन फक्त गांवकी घरकीची मुलकी कामें व जातहक्क-जसें पडे ओढणे, सरण वाहणें-हीं महारांनी आपणांकडे ठेविली; आणि फौजदारी स्वरूपाची कामें जागले, नायकवाडी (जासूद ), कोतवाल, हवालदार, ( खळे-राखण), शेतसनदी ( गांवलष्कर ), ह्यांच्या गळ्यांत घातली. नायकवाडी, कोतवाल, हवालदार, कांहीं कांहीं गांवांत आढळतात, परंतु जागले मात्र सर्वत्र आढळतात. अगदीच लहान गांव असला तर तेथे महारकी व जागलकी एकाच इसमाकडे असतात, व तो जातीने बहुधा महार किंवा मांग असतो. हवालदार, नाईकवाडी इ. बहुधा मुसलमान, मराठे, सोनार, कोळी वगैरे जातींचे लोक असतात. भील, कोळी, रामोशी, मांग, मुसलमान, महार व क्वचित् कुणबी, हे जागले असतात. जागल्या म्हणजे गांवचा पोलीस शिपाई. त्याजकडे बहुधा पोलिसचे काम असते. तो जातीचा मांग असल्यास येणेप्रमाणे घरकी कामें करतो. केरसुण्या, कुंचे, शिंकी, सोल, नाडे, कासरे, लहान मोठे दोरखंड, घोड्यांच्या आघाड्या, पिछाड्या, वेल्हें, वेठण, प्रेताची सुतळी वगैरे पुरविणे. दौंडी, कुस्त्या, यात्रा, लग्नकार्य इत्यादि प्रसंगी महार संबळ सनई व मांग डफ वाजवितात. फांशी देण्याचे काम मांगांखेरीज दुसरे कोणी करीत नाही. जागल्या मांगाव्यतिरिक्त जातीचा असल्यास तोही आपल्या जातीची गांवकी घरकीची कामें करतो.

 गांवगाड्याचा हरकाम्या महार खरा; पण जातिभेदामुळे त्याला चावडी चढतां येत नसे. त्यामुळे शिवाशिवीच्या कामांत चौगुला हा