पान:गांव-गाडा.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२      गांव-गाडा.

पाटीलकुळाचा तैनाती झाला. तो बहुधा पाटलाच्या जातीचा असे. त्याची कामें-चावडींची झाडलोट, गांवच्या दप्तरची ठेवरेव, दिवाणी मुली फौजदारी वगैरे कामांसंबंधाने लोक चावडीवर बोलावणे, आणि तेथे पाटील-कुळकर्णी सांगतील तें खिजमतीचे काम करणे इत्यादि. पाटीलकुळकर्ण्यांना चौगुल्याच्या चाकरीची गरज फक्त सरकारी कामासंबंधानेंच लागे असे नाही. पूर्वीची राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था आणि पाटीलकुळकर्ण्यांच्या अधिकारांचे व कामांचे क्षेत्र मनांत आणलें, म्हणजे हे उघड होते की, त्यांना गांवकीच्या सार्वजनिक बाबतींमध्ये चावडी भरविण्याचे अनेक प्रसंग येत; आणि त्या वेळी चौगुल्याला काम पडे. नगर जिल्ह्यांतील अकोले तालुक्यांत असे सांगतात की, कोणी मोठा माणूस गांवीं आला म्हणजे स्वयंपाकाची भांडीकुंडी जमविणे व ती उटणे ही चौगुल्याची कामें होत. वतनदार चौगुले व त्यांचे इनाम फार थोड्या ठिकाणी नजरेस पडतात. स्वराज्यांत हरएक कारणानें जो पैसा जमेला येई त्याला 'तहसील' ' इरसाल' 'पोता' असें म्हणत. पूर्वी टंकसाळी नव्हत्या, सबब खरें खोटें नाणे ओळखणे कठीण जाई. खाजगी देण्याघेण्यांत नाणे पारखण्याची अडचण येईच, पण विशेषतः गांवचा पोता तहसिलींत ( तालुकाकचेरी) पटविण्याची फार जिकीर पडे. खोटे म्हणून जर तहसिलींतून कांहीं नाणे परत आले तर ते कोणाच्या माथीं मारावे याचा पाटलाला मोठा बुचकळा पडे. ह्या सर्व गोष्टी ध्यानांत आणून गांवाने सरकारी आणि खासगी देण्यांतलें नाणे पारखण्याला व त्याच्या खरेपणाबद्दल जिम्मा घेण्याला सोनार उभा केला; आणि त्याच्या हुद्दयाचें नांव 'पोतदार' ठेविलें. सोनारांमध्ये पोतदार ही बहुमानाची पदवी आहे. तालुकाकचेरींत जमेचे पैसे जो सराफ कारकून तपासून घेतो त्याला अजून पोतदार म्हणतात. गांवच्या सोनाराने एकदां कां गांवकऱ्याचे पैसे पारखून घेतले आणि त्यांमध्ये पुढे मागे खोटे किंवा बिन चलनी नाणे निघाले तर ते त्याला पुरे पाडावें लागे. त्याची तोषीस रयतेला बसत नसे. ह्या गांवगाड्याचे कामाखेरीज तो कुणब्यांचें व अलुत्या-बलुत्यांचे सोनार-