पान:गांव-गाडा.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०      गांव-गाडा.


बोलावणे व तगादा करणे; गांवचा वसूल तहसिलींत घेऊन जाणे कागदपत्र परगांवीं पोंचविणे; पाटीलकुलकर्ण्यांबरोबर गांवांत व शिवारांत हिंडणे आणि परगांवी जाणे; गांवांत मुक्कामाला मोठे लोक, अधिकारी आले म्हणजे त्यांच्यासाठी सरपण चारा आणणे, त्यांच्या जनावरांची मालीस करणे, त्यांना दाणापाणी दाखविणे, शेणलीद काढणे, व त्यांच्या तळावर 'बशा' ( बसलेला ) बसून राहणे; गांवची व कामगारांची वेठबेगार वाहणे, त्यांना वाट दाखविणे; वाटसरांना जंगलांतून नेऊन पोंचविणे; ज्या गोष्टी लोकांना जाहीर करावयाच्या असतात त्यांची दौंडी देणे; गांवची शीव व शेताच्या बांध उरुळ्या ध्यानांत धरणे, त्या न मोडल्या जातील अशी खबरदारी घेणे व त्यांबद्दलच्या भांडणांत पुरावा देणे; दरोबस्त पिकें व खळी राखणे; रात्री काळीपांढरीत गस्त घालणे व गांव, जंगल व झाडे जतन करणे; जंगली जनावरें मारणे; रात्रंदिवस घाटांत पहारा करणे, चोरवाटा व माऱ्याच्या जागा ह्यांची माहिती मिळवणे व त्या रोखणे; गांवांत आल्यागेल्याची खबर काढणे, न देखल्या माणसावर नजर ठेवणे, वहिमी लोकांची पाटलाला वर्दी देणे; गांवांतल्या माणसानमाणसांची चालचलणूक लक्षात ठेवणे; चोरांचा तपास लावणे व माग काढणे, चावडीपुढें, वेशीपुढे व गांवचे रस्ते झाडणे, गांव साफ ठेवणे, मेलें जनावर ओढणे वगैरे होत. ह्यांशिवाय घरकी कामें महार करीत. गांवकीवर नेमून दिलेल्या महारांना 'पाडेवार' म्हणत. घरकीं कामे करणाऱ्या महाराला 'राबता' महार किंवा 'घरमहार' म्हणत. वतनदार महारांची घरकी कामें येणेप्रमाणे आहेत:-कुणब्याचें बी, औत, काठी वगैरे ओझ्यांची शेतांत नेआण करणे, दारापुढे झाडणे व गुरांचे गोठे साफ ठेवणे, सर्पण आणणे व फोडणे; मुऱ्हाळी जाणे, मिरासदार परगांवीं जाण्यास निघाला असता त्याचेबरोबर गड्याप्रमाणे जाणे, चिठ्याचपाट्या परगांवी नेणे, मौतीची खबर परगांवीं पोंचविणे, सरण वाहणे इत्यादि. ही कामें अशी आहेत की, महाराचे प्रत्येकाच्या घरीं व शेतांत येणजाणे घडे. त्यामुळे गांवचा खडानखडा त्याला ठाऊक असे. शेत, बांध किवा गांवची