पान:गांव-गाडा.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६      गांव-गाडा.


कामाबद्दल जितकी माहिती मिळाली तितकी इतर वतनदारांबद्दल मिळाली नाही. म्हणून फक्त सरकारउपयोगी गांवकामगारांची पूर्वीच्या राजवटीतील कामें येथे नमूद करण्याचे योजिलें आहे.

 दर गांवाला पाटील असतो. पाटील हा कांहीं कोणी राजाने दिलेला हुद्दा नसावा. जातपाटलाच्या नमुन्यावर सर्वश्रेष्ठ गांवमुकादमाचे पाटील हे नांव ठेवले असावें. जातपाटलाचे वर्णन दिले आहे त्यावरून गांवपाटलाच्या दर्जाची व अधिकारमर्यादेची अटकळ बांधता येईल. जातपाटलाचे सर्व अधिकार गांवपाटलाला असून खेरीज तो गांवांतला राजाचा प्रतिनिधि होता व आहे. पाटलाला गांवचा प्रभु म्हटले तरी चालेल. बहुतेक गांवांमध्ये सुरक्षिततेसाठी इतर वस्ती मध्यभागांत व पाटीलगढी गांवकुसाजवळ माऱ्याच्या ठिकाणी घातलेली आढळते. गांव वसविणारा पुढारी बहुशा गांवपाटील झाला. ज्यांनी गांव वसविला त्या मिरासदारांपैकी पाटलाचे घराणे प्रमुख व म्हणून गांवांत मानाने सर्वांत वडील असावयाचे. जो गांवची बाजू सांवरून व उचलून धरणारा आणि गांवाला घेऊन चालणारा म्हणून रयतेला पटला, आणि सरकारी काम, वसूलवासलात, बंदोबस्त बिनबोभाट करणारा म्हणून सरकाराला पटला, तो गांवचा पाटील केला. वतनाची कल्पना निघून ती पूर्णपणे रुजेपर्यंत पाटलाची नेमणूक सरकार व लोक ह्यांच्या पसंतीवर अवलंबून असावी. पाटलांना गांवापुरते मुलकी, दिवाणी, फौजदारी वगैरे कुल अधिकार असत. सर्व पाटील घरंदाज व त्यांतले बहुतेक सरदार असल्यामुळे त्यांना राजाचे बहुतेक अधिकार मिळाले, व ते त्यांनी नेकीने गाजविले. भोंसले, दाभाडे, पवार, गायकवाड, शिंदे, होळकर, ह्यांनी राज्ये कमावली तरी ते पाटिलकीला कवटाळून राहिले, आणि त्यांनी नवीन पाटीलवतनें संपादन केली. महाप्रतापशाली महादजी शिंद्यांना पाटील म्हणवून घेण्यांत भूषण वाटें हें इतिहासप्रसिद्ध आहे. 'उतरंडीला नसेना दाणा । पण दादल्या असावा पाटील राणा ॥' ही म्हण पाटलाचा मानमरातब व्यक्त करते. असो. पाटलाची मुख्य काम खाली लिहिल्याप्रमाणे होती.