पान:गांव-गाडा.pdf/64

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गांव-मुकादमानी.      ४५


 मोकदम (मुख्य अदमी) हा किताब पाटलाला असे. पाटील-चौगुल्याखेरीज सोनार, शेटे, सुतार, माळी, कुंभार, परीट, तेली, मठपती, वगैरे स्पृश्यजातींच्या वतनदारांना 'बाजेवतनदार' (बाज म्हणजे संपादन केलेला, गुणी, जसे तालिमबाज ) म्हणत. परंतु साधारणतः गांवचे सगळे श्रेष्ठ वतनदार ‘गांव-मुकादम' या नावाखाली मोडत. त्यांच्या सामान्यतः तीन ओळी किंवा प्रती करतात, त्या येणेप्रमाणे--पहिली ओळ: सुतार लोहार, चांभार, महार; दुसरी ओळः कुंभार, मांग, परीट, न्हावी; तिसरी ओळः जोशी किंवा भट, मुलाना, गुरव, कोळी. बलुतदारांची वरीलप्रमाणे सर्वत्र प्रतबंदी आहे, असे नाही. कारूंचा भरणा, काळी-पांढरीच्या मानाने प्रत्येकाच्या कामाची निकड, ह्या व अशाप्रकारच्या दुसऱ्या कांहीं कारणांचा विचार करून ज्या त्या परगण्याने ( कोठे कोठें गांवाने) आपापल्या सोयीप्रमाणे कारूंची प्रतवारी पहिल्याने लावली; आणि पुढे जसजशी प्रथमची कारणे कायम राहिलीं, अगर बदलत गेली, किंवा नाहीशी झाली, तसतसे ह्या ओळीतले कारू त्या ओळीत गेले, किंवा अजिबात कारूतून नारूंत उतरले, आणि नारूंतले लोक कारुंत चढले. जागल्या, वेसकर वगैरे महारकीच्याच कामाचे पोटविभाग असल्यामुळे अनेक ठिकाणी ही सर्व कामें महार करतात, आणि तिन्ही ओळींचें बलुतें घेतात. पाटील, कुळकर्णी हेही बलुतदार होते, आणि ते आपले चाकरीबद्दल गांव गावकऱ्यांंकडून परभाऱ्याचे ऐन जिनसीं उत्पन्न घेत. वतनदार गांवमुकादमांची पूर्वीची कामें व आतांची कामें ह्यांत पुष्कळ फरक पडला आहे. परंतु सरकारउपयोगी गांवकामगार ह्यांच्या पूर्वीच्या व आतांच्या

-----

१ अव्वल इंग्रजीत इंदापूर परगण्यांत कारूंची संख्या १४ होती व प्रतवारी येणेप्रमाणे होती-पहिली ओळ:-सुतार, लोहार, चांभार, महार; दुसरी ओळ:कुंभार, न्हावी, परीट, मांग; तिसरी ओळ:-सोनार, मुलाना, गुरव, जोशी, कोली, रामोशी. पंढरपूर परगण्यांत त्यांची संख्या १२ असून प्रतवारी येणेप्रमाणे होती-पहिली ओळ:-महार, सुतार, लोहार, चांभार; दुसरी ओळ:-परीट, कुंभार, न्हावी, मांग; तिसरी ओळ:-कुळकर्णी, जोशी, गुरव, पोतदार,