पान:गांव-गाडा.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गांव-मुकादमानी.      ४७

  एका पाटलाच्या जुनाट कैफियतीत पुढील वाक्य आढळले. 'गावची चाकरी, लावणी, उगवणी वगैरे जें सरकाराचें काम पडतें तें करीत असतों ' आतां ह्या सूत्राचा विस्तार थोडक्यांत पाहूं. नवीन कर्दीकुळे उभीं करणें, रयतेच्या विचारानें काळीचा आकार ठरविणें, गांवचें सरकारदेणें सुकर करणें, तें वसूल करून तहसिलींत पाठविणें, सरकाराच्या हुकुमांची रयतेला समज देणें व त्यांची अंमलबजावणी करणें, गांवातर्फे सरकारनें दिलेला कौल घेणें व कतबा लिहून देणें, मामलेदाराकडुन रयतेला तगाई मंजूर करवून आणविणें व फेडीचा जिम्मा आपण घेणें, रयतेचे हक, तक्रारी, सूट, तहकुबी वगैरेंबद्दल सरकारांत दाद लावणें, गांवाच्या संरक्षणासाठी जरूर ती तजवीज करणे, जागल्यामार्फत आल्यागेल्याची, नवख्या व वहिमी लोकांची खबर घेणें, गुन्ह्यांचा तलास करणें, ज्यावर गुन्ह्याचा आळ बसत असेल त्याला पकडणे, गुन्हेगारांना कैद करणें, फटके मारणें व त्यांजकडून गुन्हेगारी घेणें, जातप्रकरणी अगर सावकारी तंटे स्वतः अथवा पंच बोलावून मिटविणें, पंचनिवाड्याप्रमाणें चालण्याबद्दल जामीनकतबा घेणें व तो अमलांत आणणें, गांवची शिवतक्रार असेल तर दोन्ही गांवांच्या शिवारांतील ढेंकळे डोक्यावर घेऊन तंट्याच्या शिवेवर चालत जाऊन प्रमाण करणें, गांवावर बंड, दरोडा आल्यास शिबंदी जमवून त्याचा मोड करणें इत्यादि कामें पाटील करीत. एकंदरींत पाटील हा जितका सरकारचा अधिकारी तितकाच तो रयतेचा कैवारी होता. रयतेला मदत मिळून तिजकडून काळीची मशागत उत्तम होईल, तिजवर सरकारदेण्याचा जास्ती भार पडणार नाहीं, व तिला चोराचिलटांचा उपद्रव लागणार नाहीं, ह्यांस्तव सर्व तजविजी व खटपटी पाटील करी. गांवांत ज्या जातीचे कुणबी किंवा ज्या जातीचा भरणा असतो त्या जातीचा पाटील राहतो. ब्राह्मण पाटील क्वचित असतो. बहुतेक पाटील मराठे व त्यांच्यानजीकच्या जातीचे असतात. मुसलमान पाटीलही कित्येक ठिकाणीं नजरेस पडतात; त्यांचे पूर्वज बहुधा वतनासाठीं मुसलमान झाले असावेत. बोलणें, चालणें, कुळांची माहिती, पीक-