पान:गांव-गाडा.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वृत्ति      ४१


देण्याचे ठरविले, आणि त्यांनीही गांवांला उपद्रव न देण्याचे व दुसरे कोणी लुटारू गांवांवर आल्यास त्यांचा बंदोबस्त करण्याचे पत्करलें. अशा रीतीने पुष्कळ तोडा गिरासीये इनामदार अस्तित्वात आले. सबंध राज्य, संस्थान किंवा सरदारकी वडील मुलाला मिळे म्हणून धाकट्या मुलांचा इतमाम चालण्यासाठी जो ऐवज देत त्यास "ग्रास" म्हणत. सबंध रोटी एकाला गेली खरी, पण इतरांना घांसकुटका कांहीं तरी पाहिजे. तसें, सबंध वसूल सर्वसत्ताधिकारी राजाला दिला, तरी ज्या मानानें राजसत्ता प्रजासंरक्षणास असमर्थ होती त्या मानानें तें संरक्षण करणारे जे हे छोटेखानी उपटसूळ राजे झाले त्यांनी आपल्या हक्काला “थोडा ग्रास ” हे नांव दिले, असेंही काहींचे मत आहे. गांवगाड्याचे भरित सर्वस्वी वतनदारांचे असल्यामुळे वतनवृत्तीचे संक्षिप्त विवरण आवश्यक झाले. वतनदारांनी स्वराज्यांत गांवगाडा कसा हांकला ह्याचे दिग्दर्शन पुढील प्रकरणांत येईल.