पान:गांव-गाडा.pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०      गांव-गाडा.


(दुमाला ) आणि अप्रत्यक्ष (परभारा). पहिल्या प्रकारांत इनामदारांना सबंध महाल, गांव किंवा गांवांतील कांहीं जमीन दुमाला करून देत, व धारा वसूल करण्याचा राजाधिकारही त्यांना देत. दुसऱ्या प्रकारचे इनाम नक्त किंवा ऐनजिनसी असत. धारा वसूल करून आपल्या खजिन्यांतून सरकार इनामदारांना जी ठराविक नेमणूक रोकडीने आदा करी तिला नक्त इनाम म्हणतात; आणि जमीन धारण करणारांकडून इनामदार परस्पर ठराविक घुगरी म्हणजे दर बिघ्यास किंवा नांगरास धान्याची अमुक मापें घेत ती, अथवा बाजारहाटांत विकावयास आणलेल्या मालाची शेव-फसकी किंवा वाणगी घेत ती, ह्यांना परभारा हक्क किंवा ऐनजिनसी इनाम म्हणतात.

 हे झाले राजरोष इनाम. मध्यवर्ती राजसत्तेच्या कमकुवतपणामुळे, राजे, संस्थानिक व इनामदार, ह्यांच्या गृहकलहामुळे, आणि परस्परांबद्दलच्या साशंक व मत्सरप्रचुर वृत्तीमुळे, वेळोवेळी अनेक बिनकाळजाचे व कपटी पुरुष रयतेपासून पुष्कळ जमिनी, शेतमाल व पैसा उपटू लागले; आणि असा क्रम काही दिवस चालवून त्यालाच ते हक्क म्हणू लागले. त्यांना आकळण्याचे सामर्थ्य गांवगाड्यांत नसल्याने व ते शिरजोर होईपर्यंत राजांनी त्यांच्याकडे कानाडोळा केल्याने तेही कालावधीने गोमागणेशी इनामदार झाले, आणि गांवगन्ना हक्क उकळू लागले. खानदेशांत ठोके नांवाचे मुसलमान इनामदार आहेत. त्यांचे पूर्वज सातपुडा, सातमाळ, सह्याद्रिपर्वत व किर्र जंगले यांचा आसरा घेऊन वाटसरांना ठोकून काढून लुटीत; अशा रीतीनें बळावत जाऊन ते पुढे आसमंतांतील गांवांचेही काम काढू लागले. तेव्हां गांवांनी त्यांना दरसाल ठोक ऐवज पावता करण्याचा ठराव करून त्यांच्या लुटालुटीपासून आपली मुक्तता करून घेतली !! एकोणविसावे शतकाच्या आरंभी बंडखोर रजपूत व कोळी नाईक ह्यांनी गुजरातेंत गांवेंची गांवें लुटण्याचा सपाटा लावला, आणि सरकारकडून तर रयतेचे रक्षण होईना !! अशा अवस्थेत गांवांनी त्यांना " थोडा ग्रास " नांवाची खंडणी (घांसदाणा)