पान:गांव-गाडा.pdf/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गाव-मुकादमानी
----------------

 वतनपद्धतीच्यायोगाने गांव जरी एक आपला सवता सुभा झाला होता, तरी त्याचा संबंध परगणे-अंमलदारांशी हरवक्त आणि प्रांतअधिकाऱ्यांशी कधीकधीं पडे. ग्रॅन्टडफसाहेब लिहितात की, मोठे सरकार, त्यामध्ये परगणा, त्याचे आंत कर्यात, तिचे पोटी समंत, तिचेमध्ये महाल, त्याचे आंत तालुका, अशी दक्षिणेतील मुसलमानी राज्यांत मुलखांची नांवे होती. मराठशाहीत सुमारे साठपर्यंत गांवें मिळून तरफ, दीडशे पावणे दोनशेपर्यंत गांवें म्हणजे दोन चार तर्फा मिळून महाल किंवा परगणा, व कांहीं परगणे मिळून सुभा, ह्याप्रमाणे राज्याचे विभाग केले होते. डोंगराचा किंवा जंगलाचा भाग अमुक एका गावाच्या हद्दीत सामील केला नसल्यास त्याला तरफेंत घालीत. साधारणतः महालाचे क्षेत्र परगण्यापेक्षा लहान असे. सुभ्याला सरकार, प्रांत किंवा देश म्हणत, व कोठें कोठें सरकार हा सुभ्याचा किंवा प्रांताचा पोटभाग असे. खानदेश, गुजरात, कर्नाटक, वगैरे दूरच्या प्रांतांवर सरसुभेदाराचा अंमल होता. सुभ्यावर कुल अखत्यार सुभेदाराचा असे, व आपल्या ताब्यांतील महाल परगण्यांवर हवालदार, कमाविसदार, मामलेदार, वगैरे अधिकाऱ्यांच्या नेमणुका तो करी. पुढे पुढे हवालदारी वंशपरंपरेने चालू लागली आणि हविलदार वतनदार बनले. मामलतींत एक ते तीन परगणे येत; आणि मामलेदार व कमाविसदार ह्यांचे अधिकार जरी सारखे होते, तरी कमाविसदाराचा दर्जा किंचित् कमी असे, व त्याच्या ताब्यांतला मुलूखही कमी असे. तरफदार पगारी कारकून असत, आणि त्यांच्या हाताखाली चार पांच गांवांवर शेकदार असत. सरपाटील, सरदेशमुख, सरदेशपांड्ये, सरदेसाई व सरनाडगौडा, हे सर्वांत वरिष्ठ दर्जाचे वतनदार अधिकारी होत. पण ह्यांची संख्या फार असल्याचे दिसत नाही. दर