पान:गांव-गाडा.pdf/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९२      गांव-गाडा.

लेल्या लुच्चा-लफंग्यांना गैरवाजवी अगर अन्यायाचा पैसा ओतण्यांत धार्मिक कारण नैतिक खात्रीने नव्हे-पुण्य असेल तर महायात्रा सुफल होते असे म्हणावें !!!

 व्यावहारिक दृष्ट्या महायात्रेचा विशेष उपयोग आहे असें ह्मणवत नाही. अन्नसत्रे व सदावर्ते झोडीत जे साधू भिक्षेच्या पैशावर यात्रा करितात, त्यांना यथेच्छ सवड असली तरी ते उद्योग हुन्नरांत मन घालून वा प्रांताचें ज्ञान त्या प्रांतांत नेऊन लोकांची संसारयात्रा सुखकर करण्याच्या नादांत पडतील ही गोष्ट कालत्रयीं होणार नाही. जे शेतकरी व हुन्नरी लोक यात्रांला जातात त्यांना तिर्थविधि, क्षेत्रविधि व देवदर्शन ह्यांपेक्षा काही अधिक करण्याला वेळ,पैसा व साधनें आहेत कोठे ? गंगाजल,गंडे,प्रसाद,काही खाण्याचे व हौसेचे जिन्नस एवढे घेऊन ते परततात, व फार तर ठिकठिकाणी झालेल्या तंगीची व त्रासाची वर्णनें कशीबशी देतात. देशाटनाने प्राप्त होणाऱ्या चातुर्याने आपलें कसब सुधारावे असा यात्रेचा हेतु नसतो, आणि तसा परिणाम झाल्याचे ऐकिवांतही पण नाही. रेलवेचें हांशील व भरेकऱ्यांच्या थापा ह्यांवर भिस्त देऊन थोडक्यांत यात्रा करूं असें गोरगरीब लोक म्हणतील तर 'अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई वैद्य' या म्हणीचा खडतर अनुभव त्यांना आल्यावांचून राहणार नाही. ते ज्या वर्गातले असतात त्या वर्गाच्या लोकांची त्यांच्या ओळख-देखीच्या चावडी-कचेरीतली तारांबळ व बुडवणूक, महार जागले शिपाई प्यादे व हलके कामगार ह्यांचे त्यांशी वर्तन, भटकणाऱ्या जातींकडून होणारी गांवकामगार व हलके पोलीस ह्यांची मूठदाबी वगैरे गोष्टी लक्ष्यांत आणिल्या म्हणजे, परमुलखांत गाडीच्या गर्दीत व धांदलीत खेडवळ व फिरस्ते साधू ह्यांशी आगगाडीच्या व पोलीसच्या हलक्या नोकरांचा कसा काय संबंध घडत असेल ह्याची कल्पना सहज करितां येईल. वास्तविकपणे हा संबंध नियमित स्थली व नियमित काली पडत असतो. सबब आडवळणी खेड्यापाड्यांनी अगर डोंगराजंगलांनी रयतेशी पडत असलेल्या कनिष्ठ सरकारी नोकरांच्या संबंधापेक्षा त्यावर सक्त नजर ठेऊन तो