पान:गांव-गाडा.pdf/316

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महायात्रा.      २९३


मुक्याआंधळ्या व जाण्या-येण्याला घाबरे पडलेल्या यात्रेकरूंना सुखकर करणे किती तरी सुसाध्य आहे! परंतु तसे झाल्याची बोलवा नाहीं व अनुभवहीं नाही. उलट 'जळत्या घराचा पळता वासा' ह्या म्हणीचा जारी अमल दिसून येतो. असो. प्रस्तुत स्थितींत लोकांनी तिकिटाच्या हाशिलाची सवाई दिढी व हमालीची आठ दहा पट रक्कम तरी घेऊन निघावें हें बरें. दान-दक्षिणेसंबंधी व शिधापाण्याच्या खर्चाचीही हीच अवस्था. अंदाजापेक्षा जास्त खर्च होऊन निपूर आलेले सर्व तीर्थक्षेत्रांचे यात्रेकरू निमानीम तरी असतात. परंतु आपल्या फसगतीचे यथार्थ वर्णन दिले तर क्षेत्रांची निंदा होऊन लोक तेथे जाण्याला निरुत्साह होतील, व आपणांला पाप लागेल ह्या भोळवट समजुतीने पुष्कळ लोक तसे करीत नाहीत. तरी अज्ञात पुण्याची आशा वगळली आणि कोणत्याही बाजूने महायात्रेच्या प्रस्तुत व वास्तविक स्थितीचा विचार केला तर गोरगरिबांनी ह्या फंदात पडू नये असा न विचारतां स्पष्ट आभिप्राय देणे भाग आहे.

 आपण होऊन ह्मणा, किंवा दुसऱ्याच्या प्रोत्साहनाने ह्मणा यात्रा जात राहाणारच. तेव्हां तिला शक्य तितकी सुखकर वाट शोधिली पाहिजे. पहिली मुख्य गोष्ट अशी की, यात्रेकरूंचा रेलवेवरचा व क्षेत्रांमधील त्रास व तोटा चुकविला पाहिजे. विलायतेस ज्याप्रमाणे गुडफ्रेंड्रस सोसायटी वगैरे संस्था आहेत, त्यांच्या धर्तीवर जनतासेवेची आवड असणाऱ्या लोकांनी एखादी संस्था काढावी, आणि आपले सदस्य मोठमोठ्या स्टेशनांवर व क्षेत्रांत पाठवावेत. सरकारच्या व रेलवेच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांची सहानुभूति त्यांना खात्रीने मिळेल, आणि त्यांनी यात्रेकरूंची वंचना कोठे व कशी होते हे अमलदारांचे नजरेस आणावें. त्याच ठिकाणी त्यांना यात्रा भरती करणारांचे डावपेंचही यात्रेकरूंचे नजरेस आणतां येतील, व जेणेकरून ते त्यांच्या तावडीत न जातील अशी त्यांची समजूत घालतां येईल. दुसरी गोष्ट ही आहे की, कांहीं दक्ष तरुणांनी मनांत आणल्यास त्यांना ह्या बाबतींत स्वार्थ व परार्थ उत्तम तऱ्हेनें साधता येईल. त्यांनी जरूर ते भांडवल जमवावे आणि उतार स्टेशनांनजीक धर्मशाळांत व