पान:गांव-गाडा.pdf/314

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महायात्रा.      २८३

अशा प्रकारे फुकटफाकट सावलीत फारसें अंग न झिजवितां अवाचे सवा पैसे मिळू लागल्यामुळे शेतीसारख्या उत्पादक व प्रामाणिक धंद्यांतून गांवढेकरी बाहेर पडत आहेत, आणि क्षेत्र व स्टेशन हमालीच्या उडाणटप्पू धंद्यांत गर्दी करीत आहेत. डब्यांत किती उतारू बसवावयाचे हे त्यांतल्या पाटीवर लिहिले असते. तितके उतारू बसल्यावर जो कोणी रेलवे नोकर त्यांत अधिक उतारू बसवील त्याला रेलवे आक्टचे (सन १८९० चा अंक९) कलम १०२ प्रमाणे वीस रुपयेपर्यंत दंड होतो. ह्या कलमाची अमलबजावणी होत नसावी. ती होती तर रेलवेचे बहुतेक उत्पन्न सरकारला दंडापायींच अर्पण करावे लागते! खरे पाहूं गेलें तर ह्या कामी रेलवेकडेही फारसा दोष नाही. त्यांच्या तरतुदीपेक्षा जर जास्त यात्रा लोट्रं लागली तर त्यांनी तरी आयत्या वेळेला डबे कोठून आणावेत ? सबब त्यांना संकटांत न घालण्याचा उपाय म्हटला म्हणजे यात्रेकरूंची संख्या ओसरली पाहिजे. स्टेशनावरच्या काय आणि यात्रांच्या वाटांवरच्या गांवांतल्या किंवा क्षेत्रांतल्या दुकानदारांत काय, लोभ आणि लबाडी नखशिखांत भरली आहे. परवाना-फी द्यावी लागते, एवढ्या सबबीवर स्टेशनदुकानदार डावा माल ठेऊन तो कमीतकमी सवाईनें महाग विकतात. तीर्थविधीचे सामान चौपट महाग मिळतें. कारण विचारतां इनकमटॅक्स द्यावा लागतो असे सांगतात. निकस घाणेरडा शिधा दुकानदार दिढीदुपटीने महाग देतात. पैसाबट्ट्याशिवाय प्रयागसारख्या इलाखाच्या ठिकाणी देखील खुर्दा किंवा मोड मिळत नाही. कलाकुसरीच्या जिनसा क्षेत्रात पुष्कळ मिळतात, परंतु ठकबाजी व दलाली ह्यांचा तडाखा जबर बसतो. काशीस कोणताही माल घेण्याला गेलें की रिकामटेकडे दलाल न बोलावतां मागोमाग येतात, आणि गिऱ्हाइकाला नाहक्क बुडवितात. सारांश उपाध्ये, भिक्षुक व यच्चयावत् धंदेवाले हे सर्व भीकमाग्यांच्या ढंगांनी पूर्ण ग्रासिले आहेत; आणि सर्व जण तोंड वेंगाडून, शिव्याशाप व धमकी देऊन, भांडून तंडून अगर हातचलाखीनै मेहनतीपेक्षां, मोलापेक्षा किंवा ठरावापेक्षा ज्यास्त पैसे उगवतात. ह्या येथून तेथवर पसर-