पान:गांव-गाडा.pdf/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८०      गांव-गाडा.

 पूर्वी वाटेच्या अडचणीमुळे काशीयात्रा करणे मोठे जिवावरचे होते. यात्री परत येईलच असा भरंसा नसल्याने, यात्रेला निघण्यापूर्वी आप्तेष्टाना त्याला जेवावयास बोलविण्याचा आणि परत आल्यावर त्यानेही कालाष्टक व गंगापूजन करून मोठे जेवण (मावंदें) घालण्याचा प्रघात पडला. तेव्हां अति निवडक लोक काय ते महायात्रेच्या भानगडीत पडत. आणि यात्राही पण फार तर वर्षातून एकदां म्हणजे वसंताचे सुमारास जात असे, असें तिन्ही क्षेत्रांचें उपाध्याय व गांवोगांवचे लोक सांगतात. आतां आगगाडी झाली, दक्षिणउत्तरेचे परूस-आंगण झालें, व रेलवे-भाडे कमी दिसू लागले. चिकित्सा न करितां ब्राह्मण करतात एवढ्या हवाल्यावर ते करतात तितकी कर्मे व विधि करण्याची लालसा कारकुनी शिक्षणप्रसाराबरोबर जसजशी फैलावत चालली, तसतशी महायात्रेला यच्चयावत् जनता लोटू लागली; आणि केव्हाही पहा त्रिस्थळीत यात्रेकरू नाहीत असा एकही दिवस उगवेनासा झाला आहे. वर वर्णन केलेली अनुकूल संधि प्राप्त होतांच तीर्थोपाध्यांनी चपळाई केली, आणि आपली अमदानी म्हणजे यात्रेकरूंची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने प्रयागवाळ-गंगापुत्र-गयावाळ-परस्पर-साह्य-कारक मंडळ्या अस्तित्वांत आल्या. मजुरांच्या भरतीसाठी ज्याप्रमाणे चहाचे मळेवाले आपले एजंट देशोदेशी पाठवितात, त्याप्रमाणे ह्या मंडळीनेही आपले दलाल व नोकर प्रांतोप्रांतीं फेंकिले आहेत; इतकेंच नव्हे तर त्यांपैकी काही जणांनी पुणतांबे, नाशिक, सारखी क्षेत्रे शहरे व मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, सारखी स्टेशनें वगैरे ठिकाणी कायमचे डेरे दिले आहेत. असें सांगतात की, ... नांवाच्या गयावळाचे १६०० गुमास्ते देशावरावर घुमतात. ही संख्या अतिशयोक्तीची मानली तरी एवढे मात्र खास की, यात्रेकरू जमविण्याच्या व्यापारांत हजारो हिंदुस्थानी गुंतले आहेत. ते हरप्रयत्नाने यात्रेकरू येण्याची व त्याच्या द्रव्यबलाची बातमी मिळवितात,

-----

 १ अहमदनगर जिल्ह्यांतल्या एका वकिलांनी कोर्टात काम करतो असा मोघम धंदा पंड्याला सांगितला. त्याने तार करून ते ऐपतदार असल्याबद्दल माहिती आणविली. वकील झाडोझाड हिंडले असले तर पंड्ये पानोपान हिंडलेले असतात!