पान:गांव-गाडा.pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महायात्रा.      २८१

त्याला कोणत्याही गांवी किंवा स्टेशनावर गांठले की पुसूं पुसूं बिलबिला करतात, आणि एवढ्यावर तो हाती चढला नाही तर आपले मालकास अगर पुढील उतार स्टेशनच्या इसमास तार देऊन तो हस्तगत करण्याची कसोशी करतात. आम्ही प्रयागवाळाचे नोकर तुम्हांपासून खाण्यापुरते मूठभर तांदूळ घेऊन मालकाचे खर्चाने बद्रिनारायणापर्यंत तुमच्या बरोबर येऊ व खडी तैनात पहारा करूं, तुम्ही तुळशीपत्र दिले तरी आमचा मालक त्यांत संतोष मानील व तुमची यात्रा सुफळ करून देईल, इत्यादि प्रमाणे हे लोक साखर पसरतात. प्रयागवाळही आमचा माणूस म्हणून सदर इसमांना यात्रेकऱ्यांबरोबर पुढे पाठवितात, व गंगापुत्र आणि गयावळ हेही झांकली मूठ सहसा उघडी करून दाखवीत नाहीत. वास्तविकपणे हे लोक नुसते प्रयागवाळांचेच दलाल नोकर नसून गंगापुत्र व गयावळ ह्यांचेही असतात, आणि कदाचित पुढील क्षेत्रांच्या पंड्यांचेही असतील. बारीक तपास करतां असें निश्चयात्मक समजले आहे की, ह्या भरती करणाऱ्यांपैकी बहुतेक जण पंड्यांचे नोकर नसून पातीदार आहेत; आणि सामान्यतः जरी त्यांची पाती आठ आण्याची असते, तरी कांहीं भिकार तीर्थभट केवळ भोजन व भोजनदक्षिणा ह्यांवर तृप्त होतात, आणि यात्रकऱ्यांची सर्व किफायत ह्या आडत्यांना देतात. असेही ऐकण्यात आले की, साधल्यास हे तैनाती यात्रेकरूंची चोरी करतात, किंवा आपल्या सामलतींतल्या चोरट्यांना सधन यात्रेकरूंची खबर देतात. अर्थात् यात्रेकरूला मोहिनी घालण्याच्या नानाप्रकारच्या भिक्षुकी व्यापारी युक्त्या हे का योजितात, ह्याचा ह्यापेक्षा अधिक उलगडा करण्याचे प्रयोजन नाही. ह्याखेराज यात्रांचे स्थानिक भरेकरी आहेतच. यात्रेकरू काबीज करण्याचे मुख्य ठिकाण प्रयाग होय, तेथे त्याला एकदां रोंखला म्हणजे गंगापुत्र व गयावळ ह्यांचीदेखील निचिंती होते. कांहीं प्रयागवळांनी स्टेशनच्या खेपा करणाऱ्या हिंदू मुसलमान गाडीवानांशी सरकत केल्याचे ऐकिलें आहे. यात्रेकरूंनी उपाध्यायाचें नांव सांगितले तरी हे गाडीवान त्याला आपल्या सरकतदाराच्या घरी आणून सोडतात, आणि तोच तो इसम आहे असें