पान:गांव-गाडा.pdf/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पुरवणी.
महायात्रा.
----------

 आडक्या हत्ती झाला म्हणून का भलत्याने घ्यावा ? । अनंत फंदी.

 काश्याम्मरणान्मुक्तिः । ‘मरावें काशी का मरावें मिराशी' 'न लागो पुत्राचा हात पण लागो डोमाची लाथ. ' असे लोक म्हणत आले आहेत. 'काशीयात्रा घडो' हा आशीर्वाद बहुधा विधवा स्त्रियांना देण्याचा प्रचार आहे. 'माझ्या नशिबांत महायात्रा आहे काय ?' असें आपला हात किंवा पत्रिका सामुद्रिक-ज्योतिष्याला दाखवून विचारणारे जुन्या समजुतीचे पुष्कळ गृहस्थ निघतील. प्रयाग, काशी, आणि गया, ह्या त्रिस्थली यात्रेला महायात्रा म्हणतात. प्रयागास त्रिवेणीचे वृत्तिवान् उपाध्ये प्रयागवाळ, काशीस मणिकर्णिकेचे गंगापुत्र व गयेस गयावाळ असे तद्देशीय तीर्थोपाध्याय आहेत. उत्तर हिंदीस्तानांत उपाध्यायाला सामान्यत्वें पंड्या म्हणतात. ह्या तिन्ही क्षेत्रांचे महात्म्य वर्णन केले आहे असे अनेक कथाभाग संस्कृत-प्राकृत ग्रंथांमध्ये जागोजाग आढळतील. तरी ह्या कर्मभूमीत जन्म घेऊन महायात्रा घडावी; आणि प्रयागामध्ये त्रिवेणीस्नान व सौभाग्यवतीचें वेणीदान करावें, काशीमध्ये मणिकर्णिकास्नान व पिशाचमोचन करावे, तसेंच कालभैरवाचे देवळांतील गंडे-विक्याकडून त्याचा हलका सोटा खाऊन यमराजाचा मोठा सोटा चुकवावा, गयेमध्ये विष्णुपदावर पिंडदान आणि अक्षय वटाखाली गयावळाकडून आत्मसहित सर्व कुलाची जन्ममरणापासून मुक्ति करून घ्यावी, असें प्रत्येक हिंदूच्या मनांत येणे साहजिक आहे.

-----

 १ काशीवासाविषयीं भर्तृहरीची आतरता इतकी होती---

  कदा वाराणस्याममरतटिनीरोधसि वसन्।

  वसानः कौपीनं शिरसि निदधानोञ्जलिपुटम् ॥

  अये गौरीनाथ त्रिपुरहर शम्भो त्रिनयन ।

  प्रसीदेत्याकोशन्निमिषमिव नेष्यामि दिवसान् ॥ वैराग्यशतक