पान:गांव-गाडा.pdf/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.      २७७

ती यशस्वी होण्याचा संभव आहे. अशा रीतीने वसाहतींत किंवा शाळांत अगर अन्य तऱ्हेने जे गुन्हेगार किंवा गुन्हेगारजातींचे लोक भरंवशालायक कामकरी ठरतील,त्यांना पहिल्याने स्वतंत्र पण योग्य बंदोबस्तांत काम मिळाले आणि तेथे त्यांच्या चालचलणुकीचा बोभाटा झाला नाही, म्हणजे इतर लोकांप्रमाणे त्यांनाही हलके हलके खाजगी काम मिळून इमाने इतबारे पोट भरतां येईल. अशा प्रकारे काम मिळू लागेपर्यंत केवळ पोटासाठी अथवा अल्पस्वल्प दिखाऊ फायद्यासाठी लांडीलबाडी करण्याचा मोह त्यांना पडणार नाही ह्याबद्दल सरकार व सार्वजनिक संस्था ह्यांनी खबरदारी ठेविली पाहिजे. 'गप्प बसण्याचे काय घेशील' या तत्त्वाप्रमाणे त्यांना सार्वजनिक पैशाने पोसलेले पत्करलें, पण त्यांचे गुन्हे नकोत. कारण गुन्हेगारांना शिक्षा देण्यापेक्षा गुन्हा होऊ न देण्याचे शिक्षणप्रसारासारख्या योजनेला खर्च व खटपट कमी पडते, असें लॉर्ड मेकॉले ह्यांनी आपल्या शिक्षणावरील भाषणांत सिद्ध करून दाखविले. मुदतबंदीच्या कराराने जे मजूर नेण्यांत येतात त्यांमध्ये जर गुन्हेगारजातींच्या लोकांची भरती केली तर स्वार्थ व परार्थ दोन्ही साधतील. अशा मजुरांच्या धन्यांना कायद्याने ज्या विशेष सवलती दिल्या आहेत, त्यांचा मोबदला म्हणून वहिमी मजूर पत्करणे हे 'देवाण घेवाण' अशांतले होईल. हे लोक शरीराने सुदृढ व अकलेनें चलाख असतात, आणि थोड्या बंदोबस्ताने ते आपल्या धन्याचे कोट कल्याण करून देतील ह्यांत शंका नाही. कोणाचा आधार नसल्यामुळे पर ठिकाणी त्यांना चांगले वर्तन ठेवावे लागेल आणि कामही भरपूर करावे लागेल. अशा रीतीने वठणीस येऊन व लायक कामकरी बनून जर ते आपापल्या मुलखांत परतले, तर मजुरांच्या तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यास बरीच मदत होईल.

 चालत्या गांवगाड्यांतलें पुष्कळ भरित ह्या बोलत्या गांव-गाड्याबाहेर उरले आहे; आणि ते कोठें गांवांत तर कोठे वनपर्वतांत पांगले आहे. आपल्या ह्या बंधूंना निरक्षर म्हणून मागासलेले गणण्याची चाल पडली आहे. पण गंजाखाली पाणीदार पोलादही निमूटपणे दिवस कंठतें,