पान:गांव-गाडा.pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७६      गांव-गाडा.

ते गुन्हा करतील आणि आपल्याला प्रायश्चित्त द्यावे लागेल, अशी लोकांना भीति वाटते. कानफाट्या नांव पडल्यामुळे कोठे कांही गुन्हा झाला की ह्यांना पोलीसचे बोलावणे यावयाचे. ते गेले म्हणजे कामाची खोटी होते, ही त्यांना कामावर ठेवण्यांत दुसरी अडचण होय. पूर्वी गुन्हेगार जातींच्या मागें हजरी असे, व तिजमुळे त्यांना उद्योग पत्करणे कठीण जाई. मुसलमानांच्या मागें हजरी नाही म्हणून ती चुकविण्यासाठी हजेरीतला एक भील मुसलमान झाला व त्याने नांव बदललें असें एका गावी आढळलें. गुन्हेगार जातींच्या लोकांप्रमाणे शिक्षा भोगलेल्या भल्या जातींच्या लोकांनाही कोणी कामावर ठेवीत नाहीत. असले इसम बेकार होऊन उपाशी मरण्यापेक्षा तुरुंगांत जाऊन पोट भरण्याचा हेतु धरून मुद्दाम गुन्हे करतात. कामधंदे मिळवून देऊन गुन्हेगारांना समाजाचे उपयुक्त घटक बनवावें, व पुन्हा गुन्हा करण्याकडे त्यांची प्रवृत्ति होऊ नये म्हणून त्यांना मदत करण्यासाठी सरकारच्या आश्रयाने एक संस्था मुंबईस निघाली आहे. भरपर लोकाश्रय मिळून तिची फत्ते होवो ! ह्या कामी आज गांठचा पैसा जातो असें जरी कोणाला वाटले तरी दूरदृष्टीने पहातां हे कोणालाही अंदाजतां येईल की, गुन्हेगारांना प्रामाणिक कामगार बनविण्यांत खर्च होणारा पैसा त्यांच्या चोऱ्यादरोड्यांच्या ऐवजाच्या मानानें कांहींच नाही, व त्यांचे पिदीजाद गुन्हे बंद होण्यांतच सर्वाचे शाश्वत हित आहे. पार्शी कर्ण टाटाशेट ह्यांनी लक्षावधि रुपये देऊन मुक्तिफौजेमार्फत गुन्हेगार जातींच्या वसाहती करण्यास सुरुवात केली आहे, व सरकारही प्रांतोप्रांती सदर संस्थेला ढळत्या हाताने पैसे पुरवीत आहे. हिंदू, मुसलमान, आर्य, ब्रह्मो वगैरे धर्मानी पुढे सरसावून ह्या पुण्य कृत्याला कंबर बांधली तर त्यांना ह्या कामीं मुक्तिफौजेपेक्षाही सत्वर व परिणामकारक यश येईल. सरकारने कैकाडी लोकांना सोलापूर जिल्ह्यांत निरनिराळ्या गांवी जमिनी देऊन बैलांसाठी तगाईही दिली. तथापि एकमेकांना भेटण्याच्या बहाण्याने ते गांवोगांव चोऱ्या माऱ्या करीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. विजापूर जिल्ह्यांत गुन्हेगारांची एक नवीन वसाहत सरकाराने काढली आहे, आणि