पान:गांव-गाडा.pdf/301

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७८      गांव-गाडा.

हे विसरता कामा नये. हे लोक अनादि कालापासून बिकट परिस्थितीशीं झगडून संसारयात्रा करीत असल्यामुळे नानातऱ्हेचे-विशेषतः शेती, वनस्पति, मनुष्य-पशु-पक्षी-वैद्यक इत्यादींचें-ज्ञानभांडार त्यांच्या तोंडांत व दिल-दप्तरांत नुसते खेळत आहे. जर साक्षर मंडळी नमते घेऊन त्यांच्याच सुतासुताने घेतील तर ह्या वस्तुस्थितीविषयी त्यांची बालंबाल खात्री झाल्यावांचून राहणार नाही. तसेच मानापमान गुंडाळून ठेवून जर संशोधक व सुधारक रानोमाळ हिंडून त्यांच्यामध्ये मिसळतील तर नानाविध सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक माहितीची किती तरी मनोरम व बिनमोल लेणी ह्या नैरक्षर्य-पर्वताच्या उदरांत दडून राहिली आहेत, हे त्यांना कळून येऊन विलक्षण ज्ञानानंदाचा अपूर्व आस्वाद लाभेल ह्यांत संशय नाही. तेव्हां ह्या बाहेर राहिलेल्या भरिताचाही थांग व व्यवस्था लावणे त्वरित व देशहितास्तवच नव्हे तर मानवधर्मपालनास्तवहीं अत्यंत इष्ट आणि अवश्य आहे. ठिकठिकाणच्या लोकाग्रणींनी मनावर घेतले तर एक दोन तपांत बाताबेताच्या खर्चाने हे काम बरेंच उठेल; आणि ते त्याला हातभार लावतील अशी उमेद बाळगण्यापुरतीं सुचिन्हें क्षितिजावर स्पष्ट दिसत आहेत. कारण आपल्या समाजांतले अनेक भाग चहूंकडून खडबडून जागे झाले आहेत, आणि कित्येक तर फुंकून रस्ताही चालू लागले आहेत. तरी गांव-गाड्याने धरलेली वाट बरोबर आहे किंवा नाही ? नसल्यास कोठे व कशी दिशाभूल झाली, ह्याचा निर्णय देण्यासाठी अधिकारी मार्गोपदेशकांना नम्रतेने फूल लावून त्यांचा शकुन मिळेपर्यंत तूर्त येथेच तो सोडू या.

गांव-गाडा.pdf