पान:गांव-गाडा.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४      गांव-गाडा.

असतात. मंडळीच्या पेढीवर जे ठेवी ठेवितात, त्यांना चालू ठेवीवर दरसाल दरशेकडा १σ९ आणे, सहा महिने मुदतीच्या ठेवीवर ३σ२ आणे,आणि वर्षावरील मुदतीच्या ठेवीवर ६σ४ व्याज मिळते. जे सभासद पेढीवर कर्ज काढतात, त्यांना दरसाल दर शेकडा ९।१० टक्के व्याज पडतें. मंडळीचे हिशेब दरसाल सरकारचे हिशेबनीस तपासतात; शिवाय त्यांजवर लहानमोठ्या सर्व अमलदारांची नजर व तपासणी असते. मंडळीचे दस्तैवजांस स्टॅप व नोंदणीफी सरकारने माफ केली आहे, आणि कोर्टमार्फत व पंचायतमार्फत घेणं उगविण्याच्या कामींही विशेष सवलती दिल्यामुळे मंडळीचे कर्जवसुलाचे काम साधारण सावकारी दाव्यांप्रमाणे दिवसगतीवर न पडतां तडकाफडकी होते. हिंदुस्थानांत सन १९१३ सालपर्यंत १२३२४ अशा मंडळ्या झाल्या असून सदर सालांत त्यांचे सभासद ५७३५३६ व भांडवल पांच कोटी रुपयांवर होते. ह्याचा फायदा सुमारे साठ लक्ष लोकांनी घेतला आणि हलके व्याज व सचोटीचा हिशेब ह्यांमुळे त्यांची एका वर्षांत वीस लाख रुपयांची बचत झाली. गेले साली मंडळ्यांची संख्या १५६७३ झाली, व भांडवल सात कोटी एकाहत्तर लक्षांवर जाऊन त्यांस सुमारे २५ लक्ष ४७ हजार नफा मिळून सालअखेर त्यांजवळ साडे पसतीस लाख शिल्लक उरली. गुदस्तसालपर्यंत मुंबई इलाख्यांत ६९८ मंडळ्या स्थापन झाल्या, त्यांचे भांडवल रु.६६१३१३५ म्हणजे अर्धकोटीवर असून त्यांत सभासद ६६७०४ होते; आणि त्यांना दरसाल शेकडा सहा टक्के व्याज सुटले. त्यांपैकी शेतकऱ्यांच्या सहकारी मंडळ्या ५६८, सभासद ३८६२१ व भांडवल रु. २८०३८४९ आणि विणकराच्या मंडळ्या २९ व भांडवल रु. १०६४९० होतें. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून असें समजते की, १९१५ चे मार्चअखेर मंबई इलाख्यांत अशा मंडळ्यांची संख्या ८१७ पर्यंत गेली आहे. त्यांची फोड येणेप्रमाणे आहे. शेतकऱ्यांच्या मंडळ्या ६३१, बिनशेतकऱ्यांच्या १०३, कोष्ट्यांच्याच्या २९, शेतकी सरंजाम पुरविणाऱ्या २३, धान्यभांडारे २५, सेंट्रल बँका ५, व फिडरेशन १.