पान:गांव-गाडा.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १९५

 परस्परसहकारी मंडळ्यांचा मुख्य फायदा हा की, कुणबी, हलके धंदेवाले व मजूर ह्यांना सावकारापेक्षा हलक्या व्याजाने कर्ज मिळतें, जमाखर्चात भोळें राहत नाही, व लुच्चेगिरी होत नाही. सावकारी कर्जाचें व्याज सावकार आणि तगाईचे व्याज सरकार घेते. ते काही परत गांवकऱ्यांच्या घरांत जात नाही. पतपेढीच्या व्याजाची गोष्ट तशी नाही. तें सहकारी मंडळीच्या सभासदांच्या म्हणजे रयतेच्या पदरांत पडते. तिची संपत्ति वाढते म्हणजे कर्ज मिळाल्याने गरज भागते आणि पुन्हा त्याचा नफाही खावयास सांपडतो. तगाई मिळण्यास पाटील-कुळकर्णी, जामीनदार यांचे जाबजबाब, मुलकी अधिकाऱ्यांची चौकशी वगैरे गोष्टींमुळे कालावधि लागतो. त्वरित पैसा पाहिजे असल्यास तगाईने वेळ मारून नेतां येत नाही. पुष्कळ प्रसंगी वेळ निघून गेल्यावर तगाई भेटते. पैसा पाहिजे असतो आज व तगाई मिळणार महिना पंधरा दिवसांनी. तेव्हां कित्येक वेळां भारी व्याज कबूल करून लोक पैसा काढतात, आणि तगाई मिळाल्याबरोबर तो चुकवितात. पतपेढीचा पैसा मिळण्यास इतकी दिरंगाई लागत नाही. तगाई कोणत्या कामांसाठी घ्यावयाची ती कामें ठरली आहेत. त्यांखेरीज इतर कामासाठी तगाई मिळत नाही. पतपेढीची गोष्ट तशी नव्हे. ज्या कामासाठी तगाई मिळत नाही अशा अनेक योग्य कामांसाठी पतपेढीला आपल्या सभासदांना कर्ज देतां येते. पुरातन काळापासून सावकार आणि कुळे ह्यांचे नाते सेव्य-सेवकाचें होऊन बसले आहे. त्यामुळे सावकारांत अरेरावी व जुलम, कुळांमध्ये मिधेपणा व गुलामगिरी, आणि दोघांमध्येही कपटाचरण शिरले आहे. दुसरे असे की, जो तो आपल्या पायापुरतें पाहतो, एकंदर गांवाच्या किंवा समाजाच्या हिताकडे लक्ष देऊन वर्तन करीत नाही. त्यामुळे 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' ठेवण्याची बेजबाबदार खोड आपल्या लोकांना लागली आहे. एकाद्याला जर कोणाकडे कर्ज काढावयाचं असलें आणि कर्ज देणाराने जर विचारले की, असामी कशी आहे, तर कर्ज घेणारा वाईट असला तरी आपले शब्दाने त्याचे काम होत अस-