पान:गांव-गाडा.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४      गांव-गाडा.

तो गांवचा संभावित मनुष्य असतो. पैसे घेऊन बार काढण्याला त्याला शरम वाटते, आणि दर बाराला दोन चार आणे खर्च येतो म्हणून तो टाळाटाळी करतो. वाघाची भीति नाहींशी झाल्यामुळे कोल्हे, रानडुकरें व हरणे यांची वीण फार झाली आहे; आणि ऊस, भुइमुगासारख्या किफायतदार उदिमाचा धुव्वा उडतो. लांडग्यांचा, तरसांचा, वनगाईचा उपद्रवही बराच आहे. रानटी जनावरांप्रमाणे पांखरांच्याही झुंडी पूर्वीपेक्षां पिकावर जास्त येतात व भीत नाहीत. असे सांगतात की, पूर्वी होला नांवाचा पक्षी कडे प्रांतांत सीनानदीच्या अलीकडे येत नव्हता, व तो कावळ्याप्रमाणे जमिनीवरचा दाणा वेंची पण कणसावर कधीं बसत नसे. आतां ही दोन्ही पांखरे सदर प्रांतांत बेधडक कणसावर बसून दाणा खातात. वटवाघुळे फळांचा फन्ना पाडतात. सरकारी जंगलांत दडण चांगलें सांपडते, आणि लोक नि:शस्त्र झाल्यामुळे संहार होत नाही. शिकारी साहेब लोक तरी कितीसे कामाला येणार ? तेव्हां येथे हत्यारांचा प्रश्न उपस्थित होतो. तो राजकीय महत्वाचा असल्यामुळे सरकाराला लोकांचा दिलभरवसा आल्याशिवाय व त्यांच्या सद्धेतूची पूर्ण खात्री पटल्याशिवाय त्याची वासलात समाधानकारक लागणार नाही. तथापि चर्चा सुरू होण्याला काही तरी आधार पाहिजे म्हणून खाली लिहिल्याप्रमाणे सुचवितों. प्रत्येक गांवांतल्या किंवा चार सहा गांवें मिळून त्यांतल्या संपत्तिमान अबूदार पंचांनी अशी हमी घ्यावी की, हत्यारे पंचांच्या ताब्यांत राहतील; कायदेशीर रीतीने वित्त किंवा जीवित ह्यांच्या संरक्षणाखेरीज इतर कामी त्यांचा उययोग करणार नाही किंवा होऊ देणार नाहीं; शेतकऱ्यांचे अर्जावरून त्यांचा उपयोग करूं तेव्हां खर्ची पडलेल्या दारूची व परिणामाची नोंद करूं; बेकायदेशीर उपयोग केल्यास अमुक गुन्हेगारी किंवा जामिनकी भरूं; आणि सरकार नेमील त्या अधिकाऱ्यांना हत्यारे व त्याबद्दलचे कागदपत्र वेळोवेळी दाखवू. ह्याप्रमाणे योग्य निर्बंध घालून जरूर त्या गांवाच्या शेतकऱ्यांच्या उपयोगाकरितां हत्याराचे परवाने दिले तर 'गाढवाने शेत खाल्लें पाप ना पुण्य'