पान:गांव-गाडा.pdf/204

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १८३

तेही जातां जातां सांगितले पाहिजे. ते हे की, अनेक रेल्वेना कोणत्याही प्रकारचे कुंपण नसल्यामुळे गुरे आगगाड्यांखाली चिरडून मरतात. समर्थाशी टक्कर घेण्याची लोकांना ऐपत नसल्याने रेल्वेकंपन्यांना लोकांचे नुकसान भरून देण्याची पाळी येत नाही, आणि लोक मात्र नाहक बुडतात. दरी, डोंगर, ओहोळांनजीकच्या चांगल्या चांगल्या जमिनींची किंमत घटत चालली आहे. कारण विचारतां असे सांगतात की, त्या बाजूला हरणाडुकरांचा फार त्रास होतो. झांवळ झांवळ असतांच कोल्हेहुक गांवकुसापाशी ऐकू येते, व हरणे इतकी धीट झाली आहेत की, ढवळ्या दिवसा राखणदाराच्या उशाशी येऊन पीक खातात, आणि ओरडले, धोंडे फेंकले तरी हालत नाहीत. राखणाच्या दिवसांत कुणब्याला आपल्या आईच्या दुधाची हरघडी आठवण होत असावी. दिवसभर गोफण चालवून दंड भरून येतात, आणि हर्र हुर्र, हांआं करतां करतां घसा कोरडा पडून अखेर बसतो, तरी पांखरें जनावरें दाद देत नाहीत. पुन्हां चांदणी निघाली की लागलीच गोफण, आरडाओरड, टिनचे डबे बडवून आवाज काढणे जें सुरू होतें तें फटफटेपर्यंत. जरा विसंबले की सबंध शेत थोटें होऊन जावयाचें. हा काळाचा व मनुष्यशक्तीचा किती प्रचंड खर्च आहे ? एका वयोवृद्ध पाटलाने असे सांगितले की पूर्वी घोड्यावर माणूस पाहिला की, हरिणे लांब पळत, ती आतां बेधडक घोड्याजवळून जातात. देवाने पोटापुरतें ज्ञान सर्वांना दिले आहे. एका शिकारी पारशी गृहस्थाने सांगितले की मी स्वतः जंगलांतून पिस्तुलाशिवाय चाललों तरी हरणे धूम पळतात, तीच शिकार न करणारा शिपाई गोळ्या बंदूक घेऊन चालला तरी त्याला न भितां जरा दूरवर मात्र उभी राहतात. हरणासारखी काळजी कोणी करीत नाही म्हणून 'हरिण-काळजी' शब्दप्रयोग प्रचारांत आला. परंतु आतां पहावें तो “ विश्वासोपगमादभिन्नगतयः शब्दंं सहन्ते मृगाः " हा ऋषींच्या आश्रमाचा देखावा शिवारभर नजरेस पडतो. ज्याजवळ बंदुक असते त्याला बार काढण्यास बोलवावे तर