पान:गांव-गाडा.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १४९

व शेतकरी दुकानें मांडतात. त्यामुळे थोडीशी चढाओड व पडताळा पाहण्याला जागा असते, आणि एरवींपेक्षां माल व भावही बरा असतो. तरी पण तो विशेष चांगला असतो किंवा वजनेंमापें खरी असतांत असें बहुधा घडत नाही. गिऱ्हाईक आसपासच्या खेड्यांहून येते. त्याच्या अज्ञानाचा व धांदलीचा घेववेल तितका फायदा घेण्यास दुकानदार कमी करीत नाहीत. बाजाराकडे मुकाट्याने थोडा वेळ टक लावली तर असे दिसून येईल की, "धिटाई खाई मिठाई आणि गरीब खाई लाथा," हा न्याय जसा आमच्या एकंदर व्यवहारास लागू पडतो, तसा बाजारच्या दुकानदार-गिऱ्हाइकांनाही लागू पडतो. कुणबी रानगडी पडल्यामुळे चौचाल नसतो, व त्याला मागते पुष्कळ असल्यामुळे त्याचा स्वभाव भिडस्त बनतो. तो स्वतःचा माल बाजारांत मांडतो, तेव्हां त्याच्याशी गिऱ्हाईक धिटाई करतें, व इतरांइतके दाम त्याचे पदरांत पडत नाहीत. म्हणून पुष्कळदां असें होतें की, कुणबी बाजारांत दुकान न लावतां आपला माल घाउकीनं दुसऱ्याला घालतात, आणि तो त्याच बाजारांत त्यांच्या देखत त्यावर जास्त नफा मिळवितो. विड्याची पाने, भुईमुगाच्या शेंगा, ऊस, खरबुजे, टरबुजें, फळफळावळ, वगैरेसारखा “ माकडमेवा " मालक स्वतः विकण्यास धजत नाही. असला माल खेडवळाजवळ पाहिला की संभावित दिसणारे लोक सुद्धा त्याच्या भोवती गराडा घालून त्याला भांबावून सोडतात, आणि गडबडीत कित्येकजण किंमत न देतां तो घेऊन निसटतात. बरे, एकाद्याला पकडले तर त्याचे मागे जातां येत नाहीं; कारण मागें दुकान कोणी संभाळावें, ह्याची अडचण पडते. ह्यामुळे कुणबी तो तांबोळी बागवान ह्यांना विकतो. अहमदनगर येथे

-----

 १ वऱ्हाडांतील मलकापूर गांवीं आठवडाबाजारांत माकडमेवा खेडवळांजवळून अडवून घेऊन स्वतः विकण्याला काही लोक, विशेषतः मुसलमान, असे सोकलेले दिसले की, एखाद्या खेडवळाने दुकान लावलें तर गर्दी करून माल लुटण्यापर्यंत त्यांची मजल जाते.