पान:गांव-गाडा.pdf/169

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८      गांव-गाडा.


हल्लीच्या काळांत बायका जाणत्या असणे किती अवश्य आहे, हे मागासलेल्या जातींच्या उदाहरणावरून कोणाच्याही लक्षात येईल. असो. शेतें उभी आहेत तेव्हांपासून तो खळे उलगडीपर्यंत गांवीं दुकानें असली, तरी हाळकऱ्यांची सारखी पायपीट चाललेली असते. ते बहुधा वाणसौदा, तेल, मीठ, कुंकू, दारशिणा, बांगड्या, पोत, सुईदोरा, मिठाई, कापड, शिवलेले कपडे, भांडीकुंडी घेऊन गांवोगांव फिरतात. हाळकरी बहुधा मारवाडी, लिंगायत, तेली, शिंपी, कासार, कोमटी, मुसलमान वगैरे जातींचे असतात. शेतांत किंवा गांवांत धान्य घालून बायका त्यांजवळून माल खरेदी करतात, आणि धान्याच्या व विकत घेतलेल्या मालाच्या भावांच्या त्यांच्या अज्ञानामुळे, चोरमाप-चोरकाट्यामुळे, हाळकरी चांगलाच ताव मारतात. गांवच्या दुकानांतही तोच धंदा चालतो. पुष्कळ वेळां असें पाहण्यांत येते की, गिऱ्हाईक पदरांत अंदाजाने धान्य आणतें, उदमी तें आपल्या मापाने मोजतो आणि हिशेबापेक्षां अदपाव-पावशेरापर्यंतही वर धान्य भरलें, तर तो तें तसेंच घेतो; किंवा त्याबद्दल एखादी खारीक, सुपारी, खोबऱ्याची वाटी अगर एकदोन विड्यांची तंबाखू देतो. डांगाणांत पहावें तो खुशाल मापी अच्छेर हिरड्यांना अच्छेर नागली घेऊन गिऱ्हाईक आपल्या घरी जाते. रानपसारा आहे तोंच घिसाडी, पाथरट, कंजारी, कैकाडी, वगैरे भटकणाऱ्या हुन्नरी जाति आपापला माल खपवितात. ह्या जाति बारा गांवचे पाणी प्यालेल्या असल्यामुळे त्या कुणब्यांना चांगलेच फांदाडतात, व त्या वाटसरू असल्यामुळे त्यांना माल काढण्याला दम नसतो. आयतखाऊ जातींना शेतमाल फुकट अनायासाने मिळतो. त्या तो अवाचे सवा स्वस्त देतात; आणि तोच जर चोरून आणलेला असला तर मग दुकानदाराचे दुणावलेंच समजा. दुकानदार किंवा हाळकरी मागेल त्या भावानें तो त्याला ह्या सर्व लोकांकडून मिळतो, आणि हा पडीचा भाव कुणब्यांना जाचतो.

 गांवोगांव आठवडाबाजार भरत असतात, आणि त्यांत बराच माल उठतो. आठवडाबाजारांत हाळकरी आणि आसपासच्या गांवचे व्यापारी