पान:गांव-गाडा.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४      गांव-गाडा.

हिरण्यापेक्षा फार अधिक आहे. रोकड नाण्याची किंमत कोठल्या कोठे जाऊन बसली हे चार आण्यांत गोप्रदान होते- म्हणजे प्राचीन काळी रोख पावलीपेक्षां गाय मिळणे सोपें होतें-ह्या एका गोष्टीवरून सिद्ध होते. मोठ्या शास्त्रीपंडितांच्या घरांत वेळेला शालजोड्या निघत, व इनामदाराच्या घरांत सोनें जडजवाहीर निघे; पण रोजच्या व्यवहारापुरती सुद्धां रोकड निघण्याची मारामार पडे. शेतमाल झाला किंवा कोणताही विकण्याजोगा जिन्नस हाती आला, तर तो विकून त्याची रोकड करून ठेवू आणि रोखीने प्रपंच चालवू असे कोणीही मनांत वागविलें नाही. अर्थात् रोकड ही एक अनावर शक्ति होऊन बसली, आणि ज्याचेजवळ रोकड त्याला नुसता मनमानेल तितका नफा मिळू लागला इतकेच नव्हे तर त्याचा गांवावर मोठा अंमल गाजू लागला. सरकारला तर लोक मायबाप समजतातच. पण त्याच्या खालोखाल दुकानदारांनाही मायबाप समजू लागले; आणि त्याची अशी दृढ भावना झाली की धान्य झाल्यावर सरकारने किंवा दुकानदारांनी त्यांतून हवें तितकें न्यावें, मात्र आमचा प्रपंच खंडूं देऊं नये, आणि आम्हांला उपाशी मरण्याची पाळी आणू नये. अशा रीतीनें दुकानदार आणि गिऱ्हाईक ह्यांमध्ये सेव्यसेवक भाव निर्माण झाला. सावकारांशी भांडतांना पुष्कळ कुणबी त्याला विचारतात की, 'शेत पिकलें नाहीं,तुला दाणे मागितले तेव्हां तूं चिमुटभर तरी दाणे दिलेस का ? आणि आतां आला तीन टोल्यांचे चिठोरें ( रोखा) घेऊन पैसा मागावयाला किंवा फिर्याद करावयाला!' दुष्काळांत दुकानदार गल्लाचारा परगांवीं विक्रीला रवाना करूं लागले म्हणजे गांवकरी त्यांना आडवे होतात, आणि म्हणतात की, 'आम्हांला उपाशी मारतां काय?' उधारी आणि नाण्यांचा अभाव ह्यांमुळे खेड्यांतले दुकानदार अत्यंत स्वार्थी व काढू, आणि गिऱ्हाईक आशाळू व परावलंबी होऊन 'देरे वाण्या आणि खारे प्राण्या' अशी सामान्य दैनावस्था फार दिवसांपासून प्राप्त झाली आहे.

 मृगसाल हे कुणबिकीचें साल होय. बरसात लागली म्हणजे शेतीचा