पान:गांव-गाडा.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १४५


हंगाम सुरू होतो. सुसमृद्ध शेतकऱ्यांनासुद्धां ज्येष्ठ, आषाढ, श्रावण हे महिने विवंचनेत जातात. कुणब्यांमध्ये “आखाडी” हा दुष्काळाला प्रतिशब्द आहे. 'सोळा वर्षांपूर्वी पहिली आखाडी पडली तेव्हां मी खडीवर गेलों ' असें गांवढेकरी बोलतात. ह्यावरून आषाढाचा महिना कुणब्यांना नेहमी जाचत असावा, असें अनुमान करण्यास हरकत नाही. जवळ दाणा चारा व रगदार बैल असले तर बरें, नाही तर सर्वच चिंता. ह्यावेळी कुणबी बहुधा खावटीसाठी वाढीने धान्य आणतात, आणि दुकानदार जुनें किडलें धान्य त्यांच्या माथीं मारून रासमाथ्याला एकदाणीं नवें धान्य दिढीनें क्वचित् दुणीने परत घेतात. ज्यांच्याजवळ वैरण व बैल नसतात, ते कमीत कमी दोहोत्रा व्याजाने कर्ज काढून बैलवैरण घेतात. कर्ज मिळण्याइतकी पत नसली किंवा कर्ज न काढतां निभण्यासारखे असले तर ते दुसऱ्या कुणब्यांशी 'खांदोडी' करतात. त्यायोगाने त्यांला बैल उसनवार मिळून त्याबद्दल बैलांच्या मालकाला धान्य, पैसे किंवा आपले बैल परत उसनवार द्यावे लागतात. अशा रीतीने कित्येक कुणबी जमिनींना पाळी-गोपाळी घालतात. खांदोड करण्याला ऐपत नसली तर ते "इरजिकी" ने पाळी घालतात, पेरतात व काढणी-मळणी करतात. पाळी, पेर, काढणी, मळणीला जे कुणबी मदत येतात त्यांना सकाळी न्याहारी, दुपारी जेवण,व संध्याकाळचे मोठे जेवण द्यावे लागते. अशा प्रकारच्या कामाला व त्याच्या ह्या अन्नमय मोबदल्याला इरजिक म्हणतात. महार, मांग वगैरे इरजिकीला बोलावीत नाहीत, कारण ते आपल्याबरोबर आपली मुलेंमाणसें जेवणाला आणतात आणि अन्नही मागून व चोरून नेतात, त्यामुळे निपूर येण्याची भीति असते. इरजिकेचे वेळी मांग डफ वाजवीत रहातो, आणि कामकरी “शाबासरे वाघा भलारे दादा" हे कडवें उच्च स्वरानें गातात. असो. जमीन तयार झाल्यावर दुसरी काळजी बियाची. जातिवंत बी धरून ठेवणारे कुणबी बहुतेक नामशेष झाले आहेत. तरी असेही थोडे आढळतात की, जे अर्धपोटी राहतील पण बी जतन करतील. असल्या कुणब्यांचा निर्वाह सर्वस्वी शेतीवर असतो व