पान:गांव-गाडा.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२      गांव-गाडा.


ठेवतात, गवत उपटतांना पिके तुडवितात, तेथें जें कांहीं खाण्यासारखें असेल त्याने तोबरा भरतात, आणि डोळा चुकवून ओटींत कणसें, फळं कोंबतात. एखादा कुणबी रागें भरूं लागला तर हे लोक त्यालाच विचारतात की, बळीराजा, आम्ही तुमचे पायपोस ! आम्ही पोट कशावर भरावें? इतक्यावर तो उमजला नाही तर हे लोक 'बरें बरें, असे आहे का ?' वगैरे खुणेचे व माजोरे शब्द उच्चारतात, म्हणजे कुणबी दचकतो की चोरी करून, आग लावून, किंवा जनावरांना विषप्रयोग करून हे वचपा काढणार. मग त्यांनी घेतले असेल, ते त्यांना नेऊ देण्यास बिचारा मुकाट्याने तयार होतो. कारण ‘दुर्जनं प्रथमं वन्दे' असें वाडवडील म्हणत आले आहेत. शेतात चरावयास झाले की, हे लोक चालले रात्री त्यांत आपली गुरे चारण्याला, कणसें आलीं की चालले ती खुडण्याला, सडी रचली की चालले ती फोडण्याला, आणि मळणी चालली की चालले रास उपसण्याला ! कोंडवाड्यांतील जनावरांचे लिलाव बहुशा महार मांग घेतात, कारण ती त्यांना फुकट चारावयास आणि नफ्याने विकावयास फावते. ज्या कुणब्याचें राखण जबरदस्त असते त्याचा कसाबसा बचाव होतो. पण ज्याचें राखण कमी किंवा कुतंगळ, त्याचें शेत गतकुळींं असा प्रकार आहे. महार जागल्यांची वस्ति तुटक व घाण असल्यामुळे तेथे जाण्याला तदितर कसकसतात. त्यामुळे शेत-मालाची चोरी झांकणे, व तिची विल्हेवाट लावणे, त्यांना फारसें जड जात नाही. चोरलेली कणसें कुटून त्यांचे धान्य दुसऱ्या धान्यांत मिसळले म्हणजे मुद्दा मोडतो. शेतमालाचा मुद्याचा चोर धरणे फार कठीण आहे, आणि धरला तरी चोरी शाबीत करणे त्याहून कठीण आहे. चावडी कचेरीत हेलपाटे घालण्याला कुणब्याला वेळ नसतो, व गाऱ्हाणे करणाराला लोक हलकट ठरवितात. त्यांतून कुणब्याचा पडला आडवा नाडा. दिवसां फिर्याद द्यावी, आणि रातोरात चोराचे आप्तांनी पीक कापावें, अगर जाळावे किंवा दावण बसवावी, ही जरब केवढी असेल ह्याचा ज्याचा त्यानेच विचार करावा.