पान:गांव-गाडा.pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      १०३

गांवांत पेंव फोडलें म्हणजे पेंवगुड मागण्याला महार जागले जातात. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ घरोघर वेसकरांना भाकरी मिळते. ह्याखेरीज झाडणार महार-महारणी दररोज भाकरी मागतात. साल बदलून नवे महार कामावर आले म्हणजे ते “भावईचे चेले दह्या दुधाने न्हाले । वर्षानुवर्षा पाऊस पाणी घेऊन आले" ॥ हे गाणे म्हणून घरोघर शेर मागतात. ते भाद्रपदांत पितरें मागतात, व आश्विनांत दसरा मागतात. कठीण दिवस म्हणून कुणब्याने पितराला एखाददुसरा जातिबांधव सांगितला तरी दारापुढे महारांचे कडे पडते, आणि बहुतेक भरती त्यांचीच करावी लागते. ह्यांखेरीज बारा सण, दिवस, व लग्नकार्य इत्यादि निमित्ताने जेव्हा जेव्हां गांवकऱ्यांच्या घरीं चार पाने टाकतात तेव्हां तेव्हां महार जागले व सर्व कारूनारू ह्यांना वाढणी द्यावी लागतात; आणि तो ऐपतदार असला तर लग्न, दिवस वगैरे प्रसंगी सर्व कारूनारु पंक्तीचा ठाव म्हणजे जेवण मागतात. वरवर पाहणाराला असे वाटते की, खेडवळ विशेषतः कुणबी लग्न दिवसाला उगीच जेवते गण गोळा करून बुडतो. पण आंतली गोम अशी आहे की, वऱ्हाडी व जातभाईपेक्षां कारूनारूंना जास्त अन्न जाते; आणि ते ते हक्काने काढतात. त्यांना नाही म्हणून चालावयाचें नाही. कमी पडले की नुकसान झालेच समजा. म्हणून सर्वजण निमूटपणे उरावर धोंडा ठेऊन ह्या पेंढारांची पोटपुजा करतात. अन्न उकळण्याचे कामी महार मांगांची सर्वांवर ताण असते. महार जागल्यांशिवाय इतर कारूनारू बहुधा आपापल्या असाम्यांकडेच वाढणे किंवा जेवण मागतात. परंतु महार जागले व त्यांचे जातभाई हे सर्व मिळून प्रत्येक गांवकऱ्याच्या घरी वाढणे मागण्यास जातात, व त्यांना शेर दोन शेर अन्न सहज लागते. महार मांग व हलालखोर हे मुसलमानासुद्धा सर्व जातीचे उष्टें खातात,

-----

१ ह्याचा अनुभव युरोपियन मिशनऱ्यानाही आहे. संगमनेर येथें रोमनकॅथॉलिक बिशपसाहेब आले, तेव्हां बोलावल्याच्या दिढीदुपटीने महारमांग ख्रिस्ती गोळा झाले, आणि त्यांनी फादर वायझेंप साहेबांना नवीन दळण घालावयास व चुली पेटवावयास लावले, तेव्हां कशी तरी पंगत उठली !