पान:गांव-गाडा.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      १०१


कडवळ, आंबे, पेरू, डाळिंबे, बोरे, संत्री वगैरे कोणताही उदीम कुणबी करोत; त्याची वाणगी सर्व कारूनारू, अलबत्ये गलबत्ये धर्म म्हणून मागून नेतात; आणि त्यांना नाही म्हणण्याची सोय नसते. सारांश, पेरणीला शेतांत पाय ठेवल्यापासून तो शेतांतलें तण, झुडपें खांदून काढीपर्यंत व बियांपासून तो थेट 'काशा' ( गवताच्या मुळ्या ) पर्यंत शेतांत मागणारे उभेच. त्यांतले त्यांत रिकामटेकडे म्हणून महार-मांगांचे झट विशेष असते. महार जागल्यांच्या जातींची संख्या सरासरी गांवच्या वस्तीच्या मानाने शेकडा १०-१२ असते; म्हणजे कुणब्यांना शेकडा १० वर लोक फुकट पोसावे लागतात. ही झाली महार जागल्यांच्या जातीची उघड उघड प्राप्ति. ह्याशिवाय ते कुणब्याच्या मालावर यथेच्छ आडून ताव मारतात तो वेगळाच. महार, मांग, भिल्ल, रामोशी वगैरे जातींचे पुरुष, स्त्रिया आणि मुले गवत, सरपण, तरवड, बेलाशक कुणब्यांदेखत त्यांच्या शेतांतून काढतात, किंवा चोरतात आणि विकतात. मांगांचा डोळा केकताङ अगर घायपातावर विशेष असतो. ते ते तसेंच किंवा चोरून नेतात व तुरळक विकत घेतात. केकताडाची चऱ्हांटे होतात व त्याचे कृत्रिम रेशीम बनते, म्हणून त्याला भावही चांगला असतो. राखणदार नसला किंवा पहाटेस गुंगला म्हणजे ह्यांचे चांगलें बनतें. बाजारांत बहुतेक गवत, सरपण चोरीचे येते. अहमदनगर जिल्ह्यांत राहुरी संगमनेरकडे संत्री, डाळिंबांचे बाग आहेत. त्यांतली फळे महार, मांग, भिल्ल, रामोशी चोरून नेतात, असा फार बोभाटा आहे. गवता-सरपणासाठी येतांना हे लोक भलतीच कुपाटी काढून चोरवाट पाडून

-----

 १ पारनेर येथे १९१०-११ साली पुजारी आडनांवाच्या कुणब्याच्या शेतांत रताळ्याना खांदणी लागली: तेव्हां १०-१५ महार एकदम संध्याकाळी शेतावर आले, व प्रत्येकी तीन चार शेर रताळी घेऊन गेले. सदर साली पिकावरून हीव गेलें होतें. सन १९१२ साली कडबा २०-२५ रुपये शेकडा विकत होता. आणि भर उन्हाळ्यांत १५-२० महारांनी औट्याच्या शेतांतून रताळ्यांच्या पाल्याच्या मोटा व कडवळाचे भारे आपल्या जनावरांसाठी आणिले.