पान:गांव-गाडा.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००      गांव-गाडा.

र्वाद, शाप देणे वगैरे प्रकारचा लोंचटपणा करून कार्य साधले पाहिजे. आणि इतक्याने होणाऱ्या प्राप्तीनें जर तृप्ति झाली नाही तर पुढचा मार्ग म्हटला म्हणजे चोरी. सारांश हक्क, मोहबत, भीक, लोंचटपणा व चोरी ही जपमाळेच्या मण्यांप्रमाणे एकामागून एक येतात. असो. गांवांत जें मुख्य धान्य पिकतें त्याचे शेकडा ४ ते ६ महारांना व शेकडा २ ते ४ जागल्यांना प्राप्त होतात. नांगरामागे महारांना शेर दोन शेर व जागल्यांना शेर अच्छेर बी मिळते; आणि जमीन असो वा नसो व ती ते करोत वा न करोत, कुणब्यांजवळून ते चोपून सालोसाल बीं घेतात वर जीं मांगांची जातकामें सांगितली त्यांबद्दल मांगांना जागल्याच्या उत्पन्नाचा आठवा भाग स्वतंत्रपणे मिळतो. शिवाय शेत पेरण्यापुर्वी महूर्ताने विडा सुपारी घालून बिंयानें मांगिणीची भरभक्कम ओटी भरावी लागते. जोंधळा उपटण्यापूर्वी 'पाटा' ( दहा तिफणी इतका भाग ) सोडतात. तेथे कोरभर भाकरी व एक तांब्या पाणी टाकून गळ्यांत पागोट्याचा वेढा घेऊन कुणबी पाया पडतो, त्याला 'सीतादेवी' ची पूजा म्हणतात. ह्याप्रमाणे सोडलेल्या शेत-भागांतील पीक व पूजेची भाकर महार नेतात. हा झाला कसा तरी हक्क-भिकेचा पसा. येथून पुढे दंडेली, लोचटपणा व चोरी लागते.

 धान्य उफणतांना 'उडती पाटी' महार जागले घेतात. वेटाळणी किंवा सोंगणी झाल्यावर जी कणसें खाली पडतात, अथवा भुईमूग, रताळी, बटाटे, मिरच्या, कांदे वगैरे काढून नेल्यावर जें कांही कोठे शिल्लक राहते, त्याला 'सर्वा' ह्मणतात. जिराईत पिकाच्या सर्व्याला जिराईत सर्वा व बागाईत पिकाच्या सर्व्याला बागाईत सर्वा ह्मणतात. महार, मांग, भिल्ल, रामोशी हे सर्वा हक्काने काढून नेतात. सुडी रचतांना कुणबी उत्तम गुडाचे 'कोचुळे' रचतात, त्यांतील मधला थर शेलका असतो. त्यावर महार गोळा होऊन पडतात, आणि काही दिल्याशिवाय कुणब्याला हालूं देत नाहीत. कठण, मठण, तीळ, करडई, गहूं, हरभरा, कपाशी, भोपळे, बटाटे, कोबी, मेथी, कोथिंबीर, ऊस, भुईमूग, रताळी, घास,