पान:गांव-गाडा.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      ९९


चालविण्याच्या कामांत त्यांना गांवकामगारांचे विशेषतः पोलीस पाटलाचे अंग असते. महार दर शेतांत बलुतें उकळतात, त्याला स्थानपरत्वें पेंढी, शेर, पसा अशी नावे आहेत. प्रांतपरत्वें बलुत्याचे दर, प्रकार व धान्ये निरनिराळी आहेत. कोठे दोन बैलांच्या नांगरामागें शंभर पेंढ्या तर कोठे अर्ध मण धान्य, कोठे भात नागली, तर कोठे ज्वारी बाजरी, ह्याप्रमाणे बलुतें देतात. एका गांवच्या इसमाने दुसऱ्या गांवचे शेत केले तर त्याला 'ओवांड्याने' शेत केलें असें ह्मणतात. गांवकऱ्यांपेक्षा ओवांडदारांकडून महार जागले दिढीनें बलुतें घेतात. शेतमाल तयार होऊन खळे लागले, व धान्याची राशि पडूं लागली म्हणजे त्या सरईला 'खळवट' ‘रासमाथा' "सुगी' किंवा 'हंगाम' म्हणतात. ज्या प्रदेशांत जे खाण्याचे मुख्य धान्य असेल त्याचे बलुतें कुणब्याने रासमाथ्याला द्यावयाचे असते. कुणब्याने जर तें पेरलें नाहीं तर तारतम्याने त्याचा मोबदला त्याने जें पेरलें असेल त्या धान्याच्या किंवा रोकड पैशाच्या रूपाने तो देतो. कुणब्याजवळून बलुत्याखेरीज बीबियाणे घेण्याची सर्व कारूनारूंची वहिवाट आहे. कारूनारूंना आपल्या जमिनी पेरण्यास कोणतीही अडचण येऊ नये, हा बीं पुरविण्याचा हेतु असावा. कामगार महार जागले मामूल शिरस्त्याप्रमाणे व्यक्तिशः बलुतें नेतातच, पण त्याखेरीज समस्त महार व समस्त जागले म्हणून तिसऱ्या किंवा धाकट्या ओळीचा हक्क मागण्याला सबंध महारवाडा व महार, मांग, भिल्ल, कोळी, रामोशी वगैरे ज्या जातीचे जागले असतील, तिचे सर्व पुरुष एकमेळानें शिवारांत जातात. महार जागले खळे मागण्याला एकट दुकट कधीही जात नाहीत. जमावाने गेले म्हणजे आळवणी, दाबादाब, कटकट व धमकी चालते आणि कुणबी गाय होतो. हक्कापेक्षा जास्त मागण्याची इच्छा झाली म्हणजे मोहबत पाडावी लागते. मोहबतीची मिळकत म्हणजे प्रतिष्ठित भिक्षा होय. मोहबतीपेक्षाही अधिक मागण्याची इच्छा झाली म्हणजे निलाजरेपणाने गरिबी गाऊन हात पसरला पाहिजे. भीक घालण्यास दाता नाखूष दिसला तर त्याची फाजील स्तुति, त्याला आशि-