पान:गांव-गाडा.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वेतन.      ८३


असल्यामुळे शिक्षेची आली गेली बलाय पाटलापेक्षां कुळकर्ण्यांवर जास्त आदळते. कुळकर्ण्याला वाटते की पाटील बसून पगार खातो, आणि पाटलाला वाटते कुळकर्णी माझा कारकून असून त्याला पगार जास्त. कुळकर्ण्यांच्या ताब्यांत दप्तर असल्याने रयतेला त्याची जितकी गरज लागते तितकी पाटलाची लागत नाही. तेव्हां पाटील गांवचा नामधारी प्रभु होऊन कुळकर्ण्याइतके लोक त्याला भजत नाहीत. ह्या व अशा इतर कारणांमुळे बहुतेक ठिकाणी पाटील-कुळकर्ण्यांची दिलफांक नजरेस येते. ह्या सर्वांचा परिणाम गांवचे दप्तरावर विपरीत होतो, आणि तो रयतेला भोंवतो. तो तातडीने टाळण्याचा उपाय म्हटला म्हणजे पाटलांना कुळकर्णाची परीक्षा देण्यास लावणे हा होय. असे झाले असतां कामाचा चोखपणा वाढला नाहीं तरी तें वांटले जाईल, व दप्तर पाटलाचे हातीं चढून तो नुसता टिळ्याचा अधिकारी न राहतां खराखुरा प्रमुख गांवमुकादम बनेल. शिवाय, शिक्षणप्रसाराचा बादशाही हेतु सिद्धीस जाण्याला एक प्रकारची मदत होईल, आणि परीक्षेच्या लकड्याने पुष्कळ पाटील-घराणी साक्षर होतील.

 कामाचा आणि मुशाहिऱ्याचा हिशेब घालून वतनदार गांवनौकरांच्या काम-कुचरपणाची तरफदारी करण्यांत येते. सुमारे पस्तीस वर्षापूर्वी नामदार हायकोर्टानी असा फैसल्ला दिला की, वतन देतेवेळी त्याचा प्रकार कोणता हे सरकारने ठरविले, त्याचे काम किती ह्याबद्दल सरकारनें आपणाला मुळींच बांधून घेतले नाही. तेव्हां काम वाढले ही तक्रार वतनदारांना कायद्याने करता येत नाही. त्याचप्रमाणे पूर्वी जितके वतनदार गांवकीवर असत तितकेच सतत रहावेत असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. “ कामाची सोय” हा महामंत्र सरकार कांहीं केल्या विसरत नाही. खानदेशांत चोपडें गांवाला पाटील-कुळकण्यांच्या प्रत्येकी ५७ तर्फा होत्या. त्यामुळे कामाची टंगळमंगळ चाले. हे पाहून सन १९०६-७ चे सुमारास सरकारने कामगार कुळकर्ण्यांची संख्या चार कायम केली, व बाकीच्यांस घरी बसविलें; आणि हल्ली